डेटिंग ॲप की हाॅटेलिंग स्कॅम? महागड्या हॉटेलमधील नवा स्कॅम समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 12:09 PM2024-07-07T12:09:49+5:302024-07-07T12:10:02+5:30

मुद्द्याची गोष्ट : महानगरांमध्ये डेटिंग ॲपमधून एक नवे स्कॅम उघडकीस आले आहे. खा, प्या अन् चुना लावून कलटी मारा, असा हा प्रकार आहे. सावजाला ठरावीक कॅफे किंवा पबमध्ये डेटवर बाेलाविले जाते. बिल तरुणाच्या माथी मारले जाते.

New dating app scam has come to light in metro citys | डेटिंग ॲप की हाॅटेलिंग स्कॅम? महागड्या हॉटेलमधील नवा स्कॅम समोर

डेटिंग ॲप की हाॅटेलिंग स्कॅम? महागड्या हॉटेलमधील नवा स्कॅम समोर

मनोज रमेश जोशी

एकटेपणा घालवण्यासाठी अनेक जण डेटिंग ॲपची मदत घेतात. गेल्या काही वर्षांमध्ये अशाप्रकारची अनेक डेटिंग ॲप्स उदयास आली आहेत. तारा जुळल्या की एखादी छानशी डेट प्लॅन करावी, असे अनेकांना वाटते. तरुणांसाेबत मध्यमवयीन लाेकांची यात संख्या जास्त आहे; मात्र सुरुवातीला गाेडगाेड बाेलणारी ‘डेट’ तुम्हाला चांगलेच गाेत्यात घालू शकते. डेटिंग ॲपच्या माध्यमातून खा, प्या आणि कलटी मारा... अशा प्रकारचे स्कॅम वाढत आहेत. महागड्या हाॅटेलमध्ये भेटायला बाेलाविणे. मेन्यूमध्ये नसलेली महागडी पेये ऑर्डर करायची. ते पिऊन काही तरी कारण सांगून तिथून कलटी मारून. भरमसाठ बिल पीडिताच्या माथी मारणे. अशाप्रकारे हे स्कॅम ऑपरेट केले जाते. नंतर ती तरुणी नंबर ब्लाॅक करते. तिचा पुढे संपर्क हाेतच नाही; पण ताेपर्यंत ४० ते ५० हजारांचा चुना लागलेला असताे. ते पैसे देण्याशिवाय पर्याय नसताे.

घटना १ - स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दिल्लीत आलेला तरुण डेटिंग ॲपवर एका तरुणीला भेटतो. नंतर त्यांचा व्हाॅट्सॲपवर संवाद सुरू हाेताे. लवकरच दाेघे भेटायचे ठरवतात. ती त्याला एका ठराविक परिसरात भेटायचा आग्रह करते. कारण, तेथे अनेक चांगले कॅफे आणि पब्स आहेत. दाेघे भेटतात. गप्पा रंगतात. दाेघे काही खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर करतात. नंतर ती मेन्यूकार्डमध्ये नसलेला एखादा अतिशय महागडा पदार्थ ऑर्डर करते. काही मिनिटांमध्ये अचानक ती काही तरी अघटित घडल्याचा बनाव करते आणि निघून जाते. थाेड्यावेळात बिल येते. ते पाहून तरुणाचे डाेळे पांढरे व्हायची वेळ येते. हे बिल १ लाख २० हजारांचे असते. 

घटना २ - ही घटना मुंबईत घडली. पीडित तरुणाला एका डेटिंग ॲपवर तरुणी भेटली. ती त्याला एका ठराविक पबमध्ये बाेलाविते. ती काही तरी कारण सांगून निघून जाते. त्याला पबमालक बिल देताे जवळपास ४५ हजार रुपयांचे! या बिलाचा फाेटाे पीडित तरुणाने शेअर केला आहे. त्याने याप्रकरणी पाेलिसांनाही बाेलाविले हाेते; पण फक्त ४ हजार रुपये कमी करण्यात आले. त्यांना ४० हजार रुपयांचे बिलाचे पैसे द्यावेच लागले.
घटना ३ - एका डेटिंग ॲपवर तरुणाची एका तरुणीसाेबत ओळख झाली. दाेघांनी भेटायचे ठरविले. तिने सांगितलेल्या एका कॅफेमध्ये दाेघे भेटले. तिथे काही जाेडपी फटाके फाेडत हाेती. त्यांच्याकडे खास असे अनार हाेते. तिनेही त्याच्याकडे अनारसाठी हट्ट धरला. नंतर बिल मागविले. फटाक्याचे बिल किती यावे? तब्बल ४५ हजार. ती तरुणी बहाणा सांगून निघून गेली हाेती. आपण फसलाे, हे त्याला कळाले हाेते.

अशी हाेते फसवणूक...
दिल्लीत घडलेल्या प्रकरणात पाेलिसांनी कॅफेचा मालक अक्षय पाहवा आणि ‘डेट’ अफसान परवीन यांना अटक केली.

या रॅकेटमध्ये कॅफेचे मालक, व्यवस्थापक, वेटर्स आणि अनेक महिलांचा समावेश असताे. या सर्वांचा बिलाच्या रकमेतील वाटा ठरलेला असताे. 

एक महिला दरराेज असे किमान दाेन जणांना चुना लावते.

एकच क्लब, नावे वेगवेगळी

हैदराबादमध्ये असेच एक डेटिंग रॅकेट पाेलिसांनी उद्ध्वस्त केले. त्यात धक्कादायक माहिती समाेर आली. सावज जाळ्यात अडकाविण्याची पद्धत सारखीच. पण, एकाच कॅफेचे नाव बदलत हाेते. एकाच महिलेने तीन जणांना फसवले हाेते. बिलाची रक्कम २० ते ४० हजारांच्यादरम्यान हाेती. हा कॅफे पुढे बंद असल्याचे पाेलिसांच्या तपासणीत आढळले. 

घाबरू नका, तक्रार करा 

अनेक जण फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने पाेलिसांकडे तक्रार करत नाहीत; मात्र न घाबरता पाेलिसांकडे तक्रार नाेंदवायला हवी. दिल्लीच्या घटनेत कॅफेचा मालक आणि तरुणीला अटक झाली. तरुण स्वत: स्पर्धा परीक्षेची तयारी करत हाेता. त्यामुळे ताे घाबरला नाही. 
डेटिंग ॲपवर काेणालाही भेटताना सावध राहायला हवे. केवळ पुरुषच नव्हे, तर महिलादेखील जाळ्यात अडकलेल्या आहेत.

फसू नका, असे स्मार्ट बना
एका तरुणाने साेशल मीडियावर एक किस्सा शेअर केला आहे. डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर महिले त्याला अचानक १ हजार रुपये उधारीवर मागितले. त्याला संशय आला. त्याने पैसे पाठवत असल्याचे भासवत लगेच तिला ब्लाॅक केले.

काेणाचा किती वाटा?

१५% रक्कम सावज हेरणाऱ्या महिलेला.
४५% रक्कम व्यवस्थापक व वेटर्स घेतात.
४०% रक्कम कॅफे मालक ठेवताे.

Web Title: New dating app scam has come to light in metro citys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.