नवी दिल्ली विमानतळावरची सेवा पूर्ववत, ड्रोन दिसल्यानं केली होती खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 10:11 PM2017-08-20T22:11:15+5:302017-08-20T22:22:20+5:30
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय(आयजीआय) विमानतळावर ड्रोन दिल्यानं मोठी खळबळ उडाली होती
नवी दिल्ली, दि. 20 - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय(आयजीआय) विमानतळावर ड्रोन दिल्यानं मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे विमानतळाची सेवा काही काळासाठी खंडितही करण्यात आली होती. मात्र आता सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. एका पायलटला ड्रोन उडताना दिसल्यानं हा सर्व गोंधळ उडाला होता. त्यानंतर तात्काळ त्यानं एटीसीला याची सूचना दिली. एटीसीच्या सूचनेनुसार विमानसेवा खंडित करण्यात आली होती. विमानतळावरील सर्व तीन रन-वे बंद करण्यात आले होते. या दरम्यान अनेक विमानांच्या मार्गातही बदल करण्यात आला होता. मात्र ड्रोन कोणत्या विमान कंपनीच्या पायलटनं पाहिलं, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे विमानतळ अधिकारी ब-याच सतर्कता घेत असतात.
AirAsia India confirms pilots of flight i5 799 spotted unidentified object flying close to aircraft while landing at IGI, Delhi: Statement
— ANI (@ANI) August 20, 2017
#Visuals from Delhi's IGI Airport: Flight operations resumed after being halted on spotting of a drone by a pilot. pic.twitter.com/HAtU0EnsJS
— ANI (@ANI) August 20, 2017
ड्रोन या मानवरहीत हवाईअस्त्रापासून असलेल्या संभाव्य धोक्याचा मुकाबला करण्यासाठी फ्रान्सनं लष्कराच्या गरुडसेनेला प्रशिक्षण देण्यात येत आहे.
वायव्य फ्रान्समध्ये बॉर्ड्यूपासून 130 किमी अंतरावर असलेल्या मॉन्ट-डी- मर्सान या हवाईतळावर गेल्या जूनपासून ‘गोल्डन ईगल’ जातीच्या चार गरुडांना ड्रोन दिसताच त्यांच्यावर हल्ला करून ते हवेतच नष्ट करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या गरुडांच्या कामगिरीचा मध्यावधी आढावा घेण्यात आला व ते शत्रूला नेस्तनाबूत करण्याचे कौशल्य समाधानकारकपणे आत्मसात करीत आहेत, असे प्रशिक्षक कमांडर ख्रिस्तोफ यांनी सांगितले होते.
या गरुडांना एकूण दोन वर्षांचे प्रशिक्षण देण्यात येईल. पूर्ण प्रशिक्षित झाल्यावर त्यांनी ड्रोन हवेत दिसताच त्याच्या रोखाने झेप घेऊन त्यांचा हवेतच फडशा पाडावा अशी अपेक्षा आहे. सुरुवातीस या गरुडांना जमिनीवरून झेप घेत समांतर उडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. नंतर त्यांना ५०० मीटर उंजीवर असलेल्या टाकीवरून लक्ष्यावर कशी झडप घालावी हे शिकविण्यात आले. सर्वात शेवटी त्यांना नजिकच्या पर्वतराजींत नेऊन डोंगराच्या उंच कड्यांवरून खाली दरीमध्ये झेप घेण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
गेली काही वर्षे फ्रान्स अतिरेकी हल्ल्यांचे लक्ष्य राहिले आहे व अतिरेक्यांनी प्रगत तंत्राचा अवलंब केल्याने असे हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर होण्याचा वास्तववादी धोका सर्वच सुरक्षा यंत्रणांना भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सने हे पाऊल उचलले आहे. विमानतळ, मोठ्या क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय सभा-सम्मेलने अशा संभाव्य धोक्यांच्या ठिकाणी असे तरबेज गरूड संशयास्पद ड्रोनना अचूक टिपण्यासाठी तैनात केले जाऊ शकतील. सुरक्षेसाठी मानवी जवान व विमानांचा वापर करण्याच्या तुलनेत ही गरुडसेना खूपच कमी खर्चिक आहे, याकडेही कमांडक ख्रिस्तोफ यांनी लक्ष वेधले.
या पहिल्या तुकडीतील गरुडांना फ्रेच कादंबरीकार अॅलेक्झांद्रे द््युमास यांच्या ‘थ्री मस्केटीयर्स’ या कादंबरीतील डी‘अर्तागनान, अॅथॉस, प्रोथॉस आणि अरामिस या लोकप्रिय योद्ध्यांच्या पात्रांची नावे देण्यात आली आहेत. ही पहिली तुकडी प्रशिक्षित झाल्यावर आणखी चार ‘गोल्डन ईगल’ गरुडांना प्रशिक्षित करण्याचाही फ्रान्सचा विचार आहे. ड्रोन्सचा मुकाबला करण्यासाठी गरुडासारख्या शिकारी पक्ष्यांचा वापर करण्याचा विचार करणारा फ्रान्स हा पहिला देश नाही.