बोगस डिग्री प्रकरणः ABVPनं DUSUचे अध्यक्ष अंकिव बसोया यांना केलं निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 06:00 PM2018-11-15T18:00:31+5:302018-11-15T18:08:08+5:30
दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटने(DUSU)चे अध्यक्ष अंकिव बसोया यांना बोगस डिग्री प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं निलंबित केलं आहे.
नवी दिल्ली- दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटने(DUSU)चे अध्यक्ष अंकिव बसोया यांना बोगस डिग्री प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं निलंबित केलं आहे. तसेच त्यांना पदाचा राजीनामा देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. ABVP राष्ट्रीय मीडिया प्रवक्त्या मोनिका चौधरी म्हणाल्या, त्यांची बोगस डिग्री प्रकरणात चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं खुलासाही केला आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अंकिव बसोया यांनी विजय मिळवला होता. विजयानंतर त्यांच्या पदवीवर शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेले असून, त्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.
ABVP issues fresh statement says Ankiv Baisoya has been suspended, not expelled as said in the earlier statement. https://t.co/jCuZBJwC9B
— ANI (@ANI) November 15, 2018
भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या प्रभारी रुची गुप्ता म्हणाल्या, दिल्ली उच्च न्यायालयात 20 तारखेला होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अंकिव बोगस डिग्री प्रकरणात चौकशी करत असलेले प्रो. केटीएस सराओ म्हणाले, तिरुवल्लुवर विश्वविद्यालयाच्या परीक्षा नियंत्रक सेंथिल कुमार यांच्याशी बातचीत झाली आहे.
अंकिव प्रकरणात लवकरच ते अधिकृत अहवाल पाठवणार आहेत. गरज पडल्यास ते स्वतःही तामिळनाडूमध्ये अंकिवच्या चौकशीसाठी जाऊ शकतात. 20 नोव्हेंबर रोजी अंकिव यांच्या डिग्रीतलं तथ्य उघड झालं होतं. त्यानंतर अखिल भारतीय छात्रसंघा(आइसा)च्या नेत्या कंवलप्रीत कौर आणि आम आदमी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेनं अंकिव बसोया यांनी डिग्रीवरून गंभीर आरोप केले होते.