घर शोधताय पण मिळत नाही; करा सरकारला ऑनलाइन अर्ज अन् मिळवा घर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 09:41 AM2019-07-29T09:41:12+5:302019-07-29T09:41:59+5:30
घर नसलेल्या लोकांची संख्या किती यासाठी सर्व्हेक्षण सुरु केलं आहे. हे सर्व्हेक्षण ऑनलाइन असेल
नवी दिल्ली - राजधानी दिल्ली शहरात सध्या एक अनोखं सर्व्हेक्षण सुरु आहे. हे सर्व्हेक्षण अशा लोकांसाठी आहे ज्यांना राहण्यासाठी स्वत:चं घर नाही. अनेकदा आपण घर शोधतो मात्र ते आपल्याला मनासारखं घर मिळत नाही. सरकारकडून अशा लोकांची यादी बनविण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे जर भविष्यात सरकारकडून घरांची योजना आली तर अशा लोकांचा घर देण्याबाबत प्राधान्य राहील.
दिल्ली विकास प्राधिकरण(डीडीए) यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत दिल्लीतील घर नसलेल्या लोकांची संख्या किती यासाठी सर्व्हेक्षण सुरु केलं आहे. हे सर्व्हेक्षण ऑनलाइन असेल. या सर्व्हेक्षणातंर्गत सरकारकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत ज्यांच्याकडे स्वत:चं घर नाही.
हे सर्व अर्ज www.dda.org.in या वेबसाईटवर मागविण्यात आले आहेत. हे अर्ज भरुन जवळच्या सेतू कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. डीडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत या वेबसाईटवर अर्ज मिळतील. दोन महिन्याच्या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांची यादी बनविण्यात येणार आहे.
सध्या डीडीएकडून घर नसलेल्या लोकांचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. पण ज्यावेळी घरांबाबत कोणतीही योजना सरकारकडून सुरु केली जाईल त्यावेळी अशा लोकांचा विचार प्राधान्याने करण्यात येणार आहे. हे ऑनलाइन सर्व्हेक्षण केंद्रीय आवास आणि नगरविकास मंत्रालयाच्या निर्देशावरुन सुरु करण्यात आलं आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभही अशा यादीतील लोकांना मिळणार आहे.