Delhi Mundka Fire : मृत्यूचं तांडव! WhatsApp वरील 'त्या' एका मेसेजमुळे वाचला तब्बल 100 जणांचा जीव; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 10:26 AM2022-05-14T10:26:24+5:302022-05-14T11:06:23+5:30
Delhi Mundka Fire : आगीची भीषणता लक्षात घेऊन मुंडका आणि आजूबाजूच्या भागातील लोकांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून इतर लोकांना माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं.
नवी दिल्ली - दिल्लीच्या पश्चिमेकडील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील चार मजली व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू झाला, 12 जण जखमी झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय होतं. हळूहळू आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरही पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 30 हून अधिक गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं. याच दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
आगीची भीषणता लक्षात घेऊन मुंडका आणि आजूबाजूच्या भागातील लोकांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून इतर लोकांना माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं. व्हॉट्सअॅपवरील एका मेसेजमुळे जवळपास 100 जणांचा जीव वाचवणं शक्य झाल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी क्रेनचीही व्यवस्था करण्यात आल्याचं स्थानिक रहिवासी रमेश यांनी सांगितलं. आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचेपर्यंत सुमारे 100 लोकांना बाहेर काढण्यात आलं. आमचे प्रयत्न बराच वेळ चालले, पण जेव्हा आगीनं संपूर्ण इमारतीला वेढलं, तेव्हा आमच्याकडे काहीच पर्याय उरला नाही, असंही रमेश यांनी म्हटलं आहे.
Delhi | NDRF continues the search operation in the 3-storey building in Mundka where a fire broke out yesterday. 27 bodies recovered so far.
— ANI (@ANI) May 14, 2022
"I am looking for my sister. I can't find her," says a man, Ismail, who is present at the site. pic.twitter.com/y8VnHBFUuT
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या संख्येनं लोक होते. अशा परिस्थितीत आम्ही दुसऱ्या मजल्यावरून लोकांना बाहेर काढण्यावर अधिक भर दिला. व्हॉट्सअॅप मेसेज पाहिल्यानंतर आजूबाजूचे सुमारे दोनशे लोक येथे पोहोचले. सचिन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अशी दुर्घटना यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. ही एक भयानक घटना आहे. एवढ्या लोकांचा एकत्रित मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे मालक हरीश गोयल आणि वरूण गोयल यांना अटक करण्यात आली आहे. परंतु त्या घराचा मालक अद्याप फरार आहे. "दिल्लीत लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. मी संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास-पन्नास हजार रुपयांची मदत दिली जाईल,” अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.