'हॅलो! मला अटक करा, मी पत्नीची हत्या केलीय'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:24 AM2018-09-26T11:24:57+5:302018-09-26T11:46:18+5:30
''हॅलो साहेब ! मला अटक अटक करा, मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे'', मध्यरात्री 100 क्रमांकावर आलेल्या फोनमुळे पोलीस देखील चक्रावून गेले.
नवी दिल्ली - ''हॅलो साहेब ! मला अटक अटक करा, मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे'', मध्यरात्री 100 क्रमांकावर आलेल्या फोनमुळे पोलीस देखील चक्रावून गेले. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आदर्श नगर परिसरात घडला आहे. सिलिंडर डोक्यात घालून एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केली आहे. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जो काही प्रकार पाहिला, त्यानं त्यांनाही जबर धक्का बसला.
बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेच्या शेजारी एक व्यक्ती बसलेला होता. मृत महिलेच्या शेजारी रक्तानं माखलेला एक छोटा सिलिंडरदेखील होता. यानंतर तातडीनं पोलिसांनी महिलेला जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, पत्नीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
डीसीपी असलम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव कविता असे होते आणि तिच्या पतीचे नाव सुनील शर्मा असे आहे. या दोघांच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली होती. त्यांना एका 4 वर्षांची मुलगीदेखील आहे. सुनील हा मूळचा अलिगड येथील रहिवासी आहे. आरोपीनं संशयातून पत्नीची हत्या केली.
पत्नीची का केली हत्या?
सुनीलला आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. या संशयावरुन दोघांमध्ये जवळपास दीड महिन्यांपासून वादावादी सुरू होती. ज्यावर सुनीलला संशय होता, त्या व्यक्तीची शेजाऱ्यांकडे ये-जा सुरू होती. याच कारणावरुन सोमवारी रात्रीदेखील दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. यादरम्यान, मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास सुनीलनं पत्नीच्या डोक्यात पाच किलोचा सिलिंडर घातला. या घटनेत कविताच्या डोक्याचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. तिचा जागेवरच मृत्यू झाला.
यानंतर सुनीलनं कुटुंबीयांना जागं करत रात्री 2.20 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना संपर्क साधला आणि त्यांना गुन्ह्याबाबतची माहिती दिली. पोलिसांना फोन करत सुनीलनं सांगितले की, मी आपल्या पत्नीची हत्या केली आहे, मला येऊन अटक करा. संबंधित व्यक्तीनं दारूच्या नशेत फोन केल्याचे सुरुवातीला पोलिसांना वाटले. मात्र घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. घरातील भितींवर चारही बाजूंना रक्तच-रक्त झाले होते.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू आहे.