देशातील उपचाराधीन कोरोना बाधितांचा आकडा २ लाखांहून कमी, मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 02:21 AM2021-01-22T02:21:58+5:302021-01-22T06:54:34+5:30
देशात कोरोनाचे १,०६,१०,८८३ रुग्ण आहेत. त्यातील १,०२,६५,७०६ बरे झाले व १,५२,८६९ जणांचा बळी गेला. गुरुवारी कोरोनाचे १५,२२३ नवे रुग्ण आढळले व १९,९६५ जण बरे झाले.
नवी दिल्ली : देशात कोरोना बळींच्या दररोजच्या संख्येतही मोठी घट झाली असून, गुरुवारी या संसर्गामुळे १५१ जणांचा बळी गेला. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी २ लाखांवर पोहोचली आहे, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी आहे.
देशात कोरोनाचे १,०६,१०,८८३ रुग्ण आहेत. त्यातील १,०२,६५,७०६ बरे झाले व १,५२,८६९ जणांचा बळी गेला. गुरुवारी कोरोनाचे १५,२२३ नवे रुग्ण आढळले व १९,९६५ जण बरे झाले. कोरोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण ९६.७५ टक्के झाले आहे, तर मृत्यूदर १.४४ टक्के आहे. सध्या १,९२,३०८ उपचाराधीन रुग्ण असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १.८१ टक्के आहे. जगामध्ये ९ कोटी ७३ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ६ कोटी ९८ लाख कोरोना रुग्ण बरे झाले.
मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार कोरोना लस -
- देशातील कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांत प्रथम ही लस घेण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे कळते. देशामध्ये १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली.
- कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर काही दिवसांतच लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य सेवक, कोरोना योद्धे यांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. त्याचा सर्व खर्च केंद्र सरकार करत आहे.
- लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ५० वर्षे वयावरील व्यक्ती तसेच गंभीर स्वरूपाच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या ५० वर्षे वयाखालील व्यक्ती यांना प्राधान्याने लस देण्यात येईल. या व्यक्तींमध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. कोरोना लस घेण्याबाबत अनेक लोक संभ्रमावस्थेत आहेत.
लस घेऊनही इस्रायलमध्ये १२४०० लोकांना कोरोना -
फायझर कंपनीने बनविलेली लस घेतल्यानंतरही इस्रायलमध्ये १२,४०० लोक कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील ६९ लोकांनी तर या लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तरी त्यांना या संसर्गाची बाधा झाली. फायझरची लस दिलेल्या १८९००० जणांची इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने तपासणी केली असता ६.६ टक्के लोक कोरोनाग्रस्त आढळले.