New Delhi Stampede : "माझ्या मुलीला अधिकारी बनवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं"; मजुराची काळजात चर्र करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:51 IST2025-02-19T11:50:50+5:302025-02-19T11:51:09+5:30
New Delhi Stampede: रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ४ मुलांचाही समावेश होता. यामध्ये ७ वर्षांच्या रियाचाही मृत्यू झाला.

New Delhi Stampede : "माझ्या मुलीला अधिकारी बनवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं"; मजुराची काळजात चर्र करणारी घटना
नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ४ मुलांचाही समावेश होता. यामध्ये ७ वर्षांच्या रियाचाही मृत्यू झाला. रियाचे आईवडील आणि तिचे नातेवाईक दिल्लीतील सागरपूर भागात राहतात. रियाचे वडील ओपिल सिंह मजूर म्हणून काम करतात. रिया तिसरीत शिकत होती.
ज्या रात्री चेंगराचेंगरी झाली, त्या रात्री ओपिल सिंह त्यांची पत्नी, धाकटा भाऊ आणि दोन मुलींसह प्रयागराज महाकुंभात स्नान करण्यासाठी जात होते. त्यांच्यासोबत बहीणही तिच्या कुटुंबासह महाकुंभाला जाणार होती, पण जेव्हा ओपिल सिंह रेल्वे स्थानकावर पोहोचले तेव्हा तिथे ५ ते ६ हजार लोकांची गर्दी पाहून त्यांनी घरी परत जाण्याचा निर्णय घेतला.
ओपिल सिंह यांच्या म्हणण्यानुसार, "गोंगाट आणि गर्दीत, मुलगी रियाचा पकडलेला हात सुटला. चेंगराचेंगरीत मुलगी पायऱ्यांच्या रेलिंगमध्ये अडकली. काही वेळाने, जेव्हा ते त्ंयाच्या मुलीपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की तिच्या डोक्यात एक खिळा अडकला होता आणि तिचं शरीर निळं पडलं होतं. त्यांनी ताबडतोब रियाला रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी रियाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं."
आपल्या मुलीची आठवण येताच ओपिल भावूक झाले आणि म्हणाले, "माझी मुलगी मला मिठी मारून झोपायची. ती माझी सावली होती. तिला शिक्षण देऊन सरकारी अधिकारी बनवण्याचं माझं स्वप्न होतं. मी लहानपणापासून तिची खूप काळजी घ्यायचो. मी काय अनुभवलं असेल याची कल्पनाही कोणी करू शकत नाही?"
रियाची आई अमिता सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीत काही मुलं होती जी लोकांना ढकलत होती. समोरच्या व्यक्तीला ते मुद्दाम आपल्या पायाने धक्का मारत होते. आपल्या जड बॅगा फेकत होते. आम्हाला कोणतीही घोषणा ऐकू आली नाही.