‘डेल्टा प्लस’चे नवे संकट, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सावध राहण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 06:51 AM2021-06-23T06:51:20+5:302021-06-23T06:51:42+5:30
मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की, उर्वरित सहा रुग्ण केरळ आणि मध्यप्रदेशात आहेत.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ने भारतात बरीच हानी केली आता डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचे कारण बनला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले. भारतासह जगात नऊ देशांत सापडलेल्या या व्हेरिएंटचे देशात २२ रुग्ण समोर आले असून त्यात जळगाव आणि रत्नागिरीत १६ सापडले आहेत.
मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की, उर्वरित सहा रुग्ण केरळ आणि मध्यप्रदेशात आहेत. या राज्यांना सावध राहून त्याला कसे तोंड द्यायचे हे सांगण्यात आले आहे. ज्या देशांत डेल्टा प्लस व्हेरियंटचे संक्रमण मिळाले त्यात इंग्लड, अमेरिका, जपान, रशिया, भारत, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, नेपाळ आणि चीनचा समावेश आहे. डॉ. पॉल म्हणाले की, ज्या ज्येष्ठांनी लस घेतली आहे व ज्यांना आरोग्याची कोणतीही गंभीर समस्या नाही ते पूर्ण काळजी घेऊन थोडा वेळ बाहेर फिरू शकतात. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
सध्या शाळा उघडणार नाहीत
शाळा उघडण्याबद्दल डॉ. पॉल म्हणाले की, शाळा सुरू करण्यात जोखीम आहे. शाळेत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सगळे एका जागी असतात म्हणून संक्रमणाला वाव मिळतो.
तिसरी लाट अडवता येईल
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले की, बेजबाबदार वर्तन केल्यास ती येण्याची जास्त शक्यता आहे. लसीसोबत नियम व पथ्ये पाळली तर ती टाळता येईल. जर विषाणू जास्त संक्रमित होतोय किंवा त्याने स्वरूप बदलल्यासही धोका वाढू शकतो. परंतु, सध्या त्याबद्दल भाकित करता येणार नाही. ते म्हणाले, अनेक देशांत तिसरी, चौथी लाटही आली. परंतु, अनेक देशांत दुसरीही आली नाही.
राज्यांनी काय करावे?
ज्या जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस या नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत, तिथे प्रतिबंधात्मक उपाय करावेत. चाचण्या वाढवाव्यात. लसीकरणही वाढवावे आणि तेथील विषाणूचे नमुने चाचणीसाठी पाठवावे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे.