नवा वाद: उत्तराखंडमध्ये पुन्हा चीनची घुसखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 05:30 AM2017-08-01T05:30:15+5:302017-08-01T05:30:59+5:30
भारत-भूतान सीमेवरील डोकलामवर चीनच्या सैनिकांनी केलेल्या घुसखोरीमुळे निर्माण झालेला तणाव संपला नसतानाच, चीनच्या सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटी भागात पुन्हा घुसखोरी केल्याचे उघडकीस
नवी दिल्ली : भारत-भूतान सीमेवरील डोकलामवर चीनच्या सैनिकांनी केलेल्या घुसखोरीमुळे निर्माण झालेला तणाव संपला नसतानाच, चीनच्या सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटी भागात पुन्हा घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चमोली जिल्ह्यातील बाराहोटी या सीमेजवळील गावात २५ जुलै रोजी चिनी सैन्य घुसले होते. सीमेपासून ८00 मीटर ते एक किलोमीटर आतपर्यंत ते घुसले होते.
या घुसखोरीसंदर्भात भारत सरकारने प्रतिक्रिया दिलेली नाही. या भागात दोन्ही देशांचे सशस्त्र सैनिक असता कामा नये, असे ठरले असतानाही चीनच्या शस्त्रधारी सैनिकांनी इथे घुसखोरी केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सैनिकांनी तेथे असलेल्या मेंढपाळांना गाव सोडून जाण्यासाठी जबरदस्ती केली. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे हे सैनिक होते. यापूर्वीही उत्तराखंडमध्ये चीनने घुसखोरी केली होती.
तैनात असतात नि:शस्त्र जवान-
बाराहोटीमध्ये लष्कर असू नये, असे ठरले असल्याने तेथील इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या जवानांकडे शस्त्रे नसतात. भारत व चीन या दोन्ही देशांनी १९५८ साली बाराहोटी हे ठिकाण वादग्रस्त असल्याचे निश्चित केले होते.
त्यामुळे १९६२ च्या भारताशी झालेल्या युद्धाच्या काळातही चीनचे सैनिक या भागात आले नव्हते. त्यांनी अरुणाचल प्रदेश व लडाख या भागांतच लक्ष केंद्रित केले होते.
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून बाराहोटी हे ठिकाण १४0 किलोमीटर अंतरावर आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेपाशी हा भाग येतो.
अनेक दिवसांपासून सुरू आहे वाक्युद्ध!-
डोकलाममधून चीनने
सैन्य मागे घ्यावे, अशी भारताची मागणी आहे, तर तो भाग आमचा असून, भारताने माघार घ्यावी, अन्यथा युद्धाची वेळही येऊ शकते, असा इशारा चीनने दिला आहे.