गुजरातमध्ये बोर्ड परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना 'नमो पेन' वाटल्याने नवा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2016 09:01 AM2016-03-31T09:01:04+5:302016-03-31T09:06:34+5:30
गुजरात बोर्डाच्या १०वी-१२वीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना 'नमो पेन' वाटण्यात आल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ३१ - गुजरात बोर्डाच्या १०वी-१२वीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना 'नमो पेन' वाटण्यात आल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. या पेनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व भारतीय जनता पक्षाची निशाणी असलेले कमळ यांचा फोटो असून त्याच पेनांवर ' आय लव्ह मोदी' असेही लिहीले होते. एका खासगी फर्मकडून विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर लिहीण्यासाठी हे पेन देण्यात आले होते, मात्र त्यावरून नवा गदारोळ सुरू झाला आहे. गुजरातमध्ये ८ मार्चपासून बोर्डाची परीक्षा सुरू झाली होती, त्यापूर्वीच विद्यार्थ्यांमध्ये ही पेनं वाटण्यात आली.
अहमदाबादमधील शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 'नमो पेन'ची ५ ते १० पाकिटे देण्यात आली, ज्यामध्ये प्रत्येकी पाच पेनं होती. या पेनांसोबत एक चिठ्ठीही जोडण्यात आली होती. ' हे पेन बोर्डाची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आले आहे. तसेच ही पेनं वाटण्यासाठी गुजरातच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक बोर्डाचे अध्यक्ष आर.जे. शाह व उपाध्यक्ष आर.आर.ठक्कर यांची परवानगी घेण्यात आली आहे,' असे त्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले होते.
मात्र या संपूर्ण प्रकाराबात विरोधी पक्षांनी नाराजी दर्शवली असून शाळा प्रशासनाही नाराज आहे. ' यापूर्वी परीक्षांना असा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कधीच झाला नव्हता. त्या पेनांसबोत पक्षाची निशाणी असलेल्या कमळाचाही मोठआ फोटो छापण्यात आला होता,' असे अहमदाबादमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी नमूद केले.
काँग्रेस प्रवक्ते मनीष दोशी यांनी या प्रकाराबाब तीव्र नाराजी वर्तवली आहे. 'राज्यातील शाळांमध्ये ५० हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत, मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी शिक्षणव्यवस्थेलाच राजकीय रंग देण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे' असे दोशी म्हणाले.