तीन दिवसांत मिळेल नवीन वीज कनेक्शन; ग्राहक हक्क नियमांतील सुधारणांना केंद्र सरकारची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 07:11 AM2024-02-24T07:11:59+5:302024-02-24T07:12:19+5:30

ग्राहकांचा याचा माेठा फायदा हाेणार आहे. आता महानगरांमध्ये तीन दिवस, महापालिका क्षेत्रात ७ दिवस आणि ग्रामीण भागात १५ दिवसांत नवीन वीजजोडणी मिळणार आहे.

New electricity connection will be available in three days; Central Government approves amendments to Consumer Rights Rules | तीन दिवसांत मिळेल नवीन वीज कनेक्शन; ग्राहक हक्क नियमांतील सुधारणांना केंद्र सरकारची मंजुरी

तीन दिवसांत मिळेल नवीन वीज कनेक्शन; ग्राहक हक्क नियमांतील सुधारणांना केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : सरकारने ग्राहकांना नवीन वीजजाेडणी घेण्यासाठी आणि छतावरील सौर युनिट्स बसविण्याचे नियम सोपे केले आहेत. नव्या नियमांमुळे आता झटपट वीजजाेडणी मिळणार असून, ग्राहकांचा याचा माेठा फायदा हाेणार आहे. आता महानगरांमध्ये तीन दिवस, महापालिका क्षेत्रात ७ दिवस आणि ग्रामीण भागात १५ दिवसांत नवीन वीजजोडणी मिळणार आहे.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने शुक्रवारी यासंदर्भात निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, सरकारने यासंबंधित वीज (ग्राहक हक्क) नियम, २०२० मध्ये सुधारणांना मंजुरी दिली आहे. सरकारसाठी ग्राहकांचे हित सर्वोतोपरी आहे. हे समोर ठेवून कायद्यात या सुधारणा केल्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले. डोंगराळ परिसरातील ग्रामीण भागात नवीन कनेक्शन घेण्याचा किंवा सध्याच्या जोडणीत बदल करण्याचा कालावधी पूर्वीप्रमाणेच ३० दिवसांचा राहणार आहे.

नवा नियम काय?

तीन दिवसांमध्ये मिळेल महानगरांमध्ये नवी वीजजाेडणी. आधी सात दिवसांची कालमर्यादा हाेती.

सात दिवसांत इतर शहरांमध्ये जाेडणी मिळेल. आधी १५ दिवसांची मर्यादा हाेती.

१५ दिवसांमध्ये ग्रामीण भागात जाेडणी दिली जाईल. यासाठी आधी ३० दिवसांची कालमर्यादा हाेती.

रुफटॉप सोलर सीस्टम बसविणे अधिक सोपे

रूफटॉप सोलर सिस्टम बसविणे सोपे आणि जलद झाले आहे.

१० किलोवॉटपर्यंतच्या सौर यंत्रणेसाठी तांत्रिक व्यवहार्यता अभ्यासाची आवश्यकता असणार नाही.

यापेक्षा अधिक क्षमतेच्या सौर यंत्रणांसाठी व्यवहार्यता अभ्यासाची मुदत २० दिवसांवरून १५ दिवसांवर आणली आहे.

ईव्ही चार्जिंगसाठीही नवी जाेडणी

ग्राहकांना आता इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी वेगळी वीजजाेडणी घेता येणार आहे. देशातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टाला अनुसरून घेतलेला हा निर्णय आहे.

ग्राहकांना कसा लाभ होणार?

निवासी सोसायट्यांमध्ये साधी जोडणी आणि बॅक-अप जनरेटरसाठी वेगळे बिलिंग निश्चित केले आहे.

ग्राहकांच्या तक्रारी आल्यास वीज वापराच्या पडताळणीसाठी कंपन्यांनी बसवलेल्या मीटरची तपासणी करण्याची तरतूद नियमात आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्था, बहुमजली इमारती, निवासी वसाहतीत राहणाऱ्यांसाठी सर्वांना वैयक्तिक कनेक्शन किंवा संपूर्ण कॉम्प्लेक्ससाठी सिंगल-पॉइंट कनेक्शन निवडण्याचा पर्याय असेल.

५ दिवसांत अतिरिक्त मीटर

मीटर रिडिंग प्रत्यक्ष वीज वापराला अनुसरून नसल्याचे आढळल्यास तक्रार दाखल झाल्यानंतर पाच दिवसांमध्ये अतिरिक्त मीटर लावून द्यावे लागेल. अतिरिक्त मीटरद्वारे रिडिंगची सत्यता तपासता येईल.

Web Title: New electricity connection will be available in three days; Central Government approves amendments to Consumer Rights Rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज