ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:53 AM2021-06-30T08:53:55+5:302021-06-30T08:54:41+5:30

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ड्रोनला दिशा देऊन ते स्वयंचलित करता येतात. ते कुणीही खरेदी करावे, कसेही वापरावे; हा गलथानपणा थांबला पाहिजे!

New fears of terrorist attacks by flying drones | ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय

ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय

Next
ठळक मुद्देभारतात दहशतवाद्यांतर्फे ड्रोनचा वापर हा नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर ड्रोनद्वारे अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे पाकिस्तानद्वारे पुरवली जातात

भूषण गोखले

१९०३ मध्ये राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. याच्या काही वर्षांनंतर १९१८ मध्ये तोफखान्याच्या लक्ष्यभेदासाठी मानवविरहित विमान म्हणजेच ड्रोन तयार करण्यात आले. याचा वापर मर्यादित असला तरी त्याच्या लष्करी फायद्यांचा प्रत्यय तेव्हाच आलेला होता. नंतरच्या काळात युद्धाचे तंत्रज्ञान बदलत गेले. नवनवीन शस्त्रास्त्रांची निर्मिती झाली. जेट विमानांबरोबर हेलिकॉप्टरचाही शोध लागला. ड्रोन हे मानवविरहित असल्याने लष्करी व्यूहरचनाकारांना युद्धभूमीत त्याचा प्रभावी वापर करता येऊ लागला.  काळानुरूप तंत्रज्ञान जसे बदलले तसे ड्रोनचे स्वरूपही बदलत गेले. आज लष्करी वापराबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातही ड्रोन मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून दहशतवाद्यांनीही त्याचा  उपयोग सुरू केला आहे. जम्मू काश्मीर येथील हवाई तळावर झालेला ड्रोन हल्ला ही पुढच्या धोक्याची घंटा आहे. दुर्गम प्रदेशात सुरुवातीला टेहेळणी करण्यासाठी, तसेच शत्रूंची माहिती घेण्यासाठी  सुरक्षा यंत्रणा ड्रोनचा  वापर करू लागल्या. पुढे  दुर्गम भागात खाद्यपदार्थ आणि शस्त्रास्त्रे पुरवठ्यासाठी ड्रोनचा वापर होऊ लागला.

Indian police say bomb-laden drones hit air base in Kashmir

सुरुवातीला धातूच्या स्वरूपात येणारे ड्रोन नंतर प्लॅस्टिक तसेच सिन्थेटिक पदार्थाचे तयार होऊ लागले. यामुळे रडारवर त्याचा शोध घेणे कठीण झाले. त्यात आकाराने लहान असल्याने सहजासहजी ते रडार यंत्रणेवर सापडू शकत नाहीत. अमेरिका, रशिया, इस्रायल, चीन आणि तुर्की या देशांकडे प्रगत ड्रोन तंत्रज्ञान  आहे. भारतानेही डीआरडीओच्या मार्फत रुस्तम, नेत्रा हे ड्रोन विकसित केले.  खाजगी कंपन्यांही ड्रोन विकसित करीत आहेत.  अमेरिका, इस्रायलकडून आपण ड्रोन विकत घेत आहोत.  ड्रोन आता सहजासहजी उपलब्ध होतात. साध्या दुकानांतही विकत मिळतात. या ड्रोनला अत्याधुनिक कॅमेरे लावून  क्रीडा स्पर्धांपासून   लग्न समारंभाचेही चित्रीकरण केले जाते. काही ड्रोन  खेळण्याच्या स्वरूपात असतात. आकाराने छोटे आणि मोठे तसेच ५ ते१० किलोचे वजन वाहून नेऊ शकणारे ड्रोन आज उपलब्ध आहेत. हे ड्रोन जीपीएस प्रणालीद्वारे दूरवरून ऑपरेट करता येऊ शकतात. 
१४ सप्टेंबर २०१९ रोजी सौदी अरेबियातील तेल कंपन्यांवर ड्रोनद्वारे हल्ला करून हुती दहशतवाद्यांनी माेठ्या प्रमाणात नुकसान पोहोचविले होते.  २७ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान नागोरनो काराबाक  पर्वतरांगावरून झालेल्या अझरबैजान आणि अर्मेनियाच्या युद्धात अझरबैजानने तुर्की आणि इस्रायल बनावटीच्या ड्रोनचा वापर करून अर्मेनियाच्या सैन्याला जेरीस आणले होते. या युद्धात सर्व जगाने ड्रोनची मारकक्षमताही अनुभवली. हिजबुल या दहशतवादी संघटनेही इस्रायलविरोधात ड्रोनचा वापर केला. मात्र, इस्रायलने ॲन्टी ड्रोन तंत्रज्ञान विकसित करीत हे ड्रोनहल्ले थोपविले होते. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (कृत्रिम बुद्धिमत्ता) ड्रोनला दिशा देऊन ते स्वयंचलित करता येतात. जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे लक्ष्य निर्धारित करून ते हल्ल्यासाठी वापरले जातात. भारतातही अनेक आयटी संस्थांद्वारे ड्रोन तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. नेत्रा यूएव्ही हे मुंबईच्या आयआयटीने विकसित केले आहे. तसेच खाजगी कंपन्यांनाही ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. भारतीय हवाई दलातर्फे एअर मार्शल मेहेरबाबा यांच्या नावाने ड्रोनची स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. त्यात  उत्तम दर्जाच्या ड्रोनला पारितोषिक दिले जाते. भारत आणि चीन संघर्षादरम्यान चीनने स्वॉर्म ड्रोनची ताकद जगाला दाखवली होती.  अतिउंचावरच्या सैनिकांना ड्रोनद्वारे खाद्यपदार्थ आणि शस्त्रास्त्रे पुरवली होती. भारतानेही  स्वॉर्म ड्रोनची प्रात्यक्षिके दाखवली. 

Indian air force base in Kashmir hit by explosions | India News | Al Jazeera

भारतात दहशतवाद्यांतर्फे ड्रोनचा वापर हा नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर ड्रोनद्वारे अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे पाकिस्तानद्वारे पुरवली जातात. याबाबत अनेकदा गुप्तचर संघटनांनी सतर्क केले आहे. बीएसएफच्या जवानांनीही पाकिस्तानच्या हद्दीतून येणारे ड्रोन नष्ट केले होते. मात्र, जम्मू काश्मीर येथील एअरफाेर्स स्टेशनवर झालेला हल्ला हा भविष्यातील धोक्याचा इशारा आहे. सुदैवाने या हल्ल्यात मोठी हानी झाली नाही. आज पाण्याखालून चालणारे ड्रोनही अस्तित्वात असल्याने दहशतवादी या ड्रोनचा वापर करून भारतावर समुद्रामार्गे हल्ला करण्याची शक्यता आहे. यामुळे या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही. ड्रोन नष्ट करण्यासाठी आज अमेरिका, रशिया, चीन, तुर्की, इस्रायलने नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. भारतालाही त्यादृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. रडार यंत्रणेवर न दिसणारे ड्रोन पाडण्यासाठी आज लेझर शस्त्रास्त्रे वापरली जात आहेत.   भारतानेसुद्धा इलेक्ट्रॉनिक फेन्सिंगद्वारा सर्वेलन्स वाढवून  ड्रोन नष्ट  करण्यासाठी लेझर तंत्रज्ञान, मायक्रोव्हेव शस्त्रास्त्रे आणि कम्युनिकेशन जॅमिंग, इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. संरक्षण आस्थापनांजवळ ड्रोन उडवल्यास  दहशतवादविरोधी कृत्य केल्यामुळे गुन्हा दाखल होतो.  काही वर्षांपूर्वी मुंबई विमानतळावर असाच एक ड्रोन संशयितरीत्या उडताना आढळला होता. यामुळे विमानतळावरील खाजगी उड्डाणे प्रभावित झाली होती. भारतात ड्रोन वापराबद्दल योग्य नियमावली नाही.  खरेदी-विक्रीवर कुठलेच निर्बंध नाहीत. यामुळे कुणीही ड्रोनचा कसाही वापर करतो.  ड्रोन विकत घेण्यापासून ते वापरापर्यंत कठोर नियम असायला हवेत. यासाठी भारतीय उड्डयन संस्था, संरक्षण मंत्रालय, गृहमंत्रालय आणि गुप्तचर संघटनांनी एकत्र येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Drone strike on Jammu air base: Did India know about the threat? - India News

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञान आमूलाग्र बदलते आहे. युद्धभूमीत मनुष्यहानी टाळण्यासाठी तसेच शत्रूचे जास्तीतजास्त नुकसान करण्यासाठी ड्रोन हे प्रभावी माध्यम आहे. यामुळे या तंत्रज्ञानाची तोड काढणे आज काळाजी गरज आहे.   सीमांचे व्यवस्थापन करताना भारताला या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा असला तरी तेच तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती पडल्याने देशाच्या जीवावरही उठेल.  भविष्यातील ड्रोनहल्ले थांबविण्यासाठी भारताला देशांतर्गत तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासोबतच प्रगत देशांशी हातमिळवणी करून ड्रोनविरोधी तंत्रज्ञानही विकसित करावे लागेल. 

bingomeghana@gmail.com

Web Title: New fears of terrorist attacks by flying drones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.