नव्या तंतुमय अस्तरामुळे निम्म्या खर्चात डायलिसिस शक्य
By admin | Published: November 22, 2014 02:16 AM2014-11-22T02:16:53+5:302014-11-22T02:16:53+5:30
हे रुग्णांसाठी अधिक सुरक्षित तर असेलच, शिवाय यातूनच पुढे कुठेही नेता येऊ शकणा्नरे (पोर्टेबल) व रुग्णाला स्वत:सोबत वागविता येईल असे (वेअरेबल) डायलिसिस यंत्र विकसित करणेही शक्य होणार आहे.
नवी दिल्ली : मूत्रपिंडे निकामी झालेल्या रुग्णांना अपरिहार्यपणे कराव्या लागणाऱ्या डायलिसिस उपचारांसाठी मुंबई आयआयटीच्या वैज्ञानिकांनी एक अभिनव ‘पोकळ तंतुमय अस्तर’ (हॉलो फायबर मेम्ब्रेन) विकसित केले असून त्याचा वापर केल्याने डायलिसिससाठी येणारा खर्च व लागणारा वेळ निम्म्याने कमी होऊ शकणार आहे. हे रुग्णांसाठी अधिक सुरक्षित तर असेलच, शिवाय यातूनच पुढे कुठेही नेता येऊ शकणा्नरे (पोर्टेबल) व रुग्णाला स्वत:सोबत वागविता येईल असे (वेअरेबल) डायलिसिस यंत्र विकसित करणेही शक्य होणार आहे.
मुंबई आयआयटीच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागातील संशोधकांनी हे पोकळ तंतूमय अस्तर विकसित केले आहे. डायलेसिस यंत्रातील फिल्टरमध्ये होणाऱ्या गाळप प्रक्रियेसाठी हे अस्तर वापरले की त्यामुळे रक्त शुद्धिकरणाचे काम अधिक वेगाने, कमी खर्चात होऊ शकेल व याचे रुग्णावर होणारे दुष्परिणामही तुलनेने कमी असतील, असे या संशोधन गटाचे प्रमुख जयेश बेल्लारे यांनी सांगितले.
हे अस्तर वापरून हेमोडायलिसिस केले की रक्तातील अशुद्ध द्रव्ये विलग करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने व नैसर्गिकरीत्या होऊ शकते. परिणामी डायलिसिससाठी लागणारा वेळ वाचतो व साहजिकच खर्च ही कमी होतो, असेही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हेच सूत्र पकडून पुढे आणखी संशोधन केले तर भविष्यात मूत्रपिंड अथवा यकृताचे काम करू शकेल असा जैव-कृत्रिम अवयवतयार करणेही शक्य होईल, असेही बेल्लारे यांचे म्हणणे होते.
या नव्या पोकळ तंतूमय अस्तराच्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून आता प्रत्यक्ष उपचारपूर्व चाचण्या घेतल्या जायच्या आहेत.
या उत्पादनासाठी भारतात ‘पेटन्ट’ घेण्यात आले असून या अस्तराच्या कमी खर्चात उत्पादनासाठी गेली दोन वर्षे एक पथदर्शी संयंत्रही चालविले जात आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)