सुप्रीम कोर्टात नवे पाच न्यायाधीश
By Admin | Published: February 16, 2017 12:47 AM2017-02-16T00:47:28+5:302017-02-16T00:47:28+5:30
प्रदीर्घ विलंबानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पाच नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यायामूर्तींच्या नियुक्तीपत्रांवर स्वाक्षरी
हरिश गुप्ता / नवी दिल्ली
प्रदीर्घ विलंबानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पाच नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यायामूर्तींच्या नियुक्तीपत्रांवर स्वाक्षरी केली असून, अधिसूचना लवकरच निघेल. ‘लोकमत’ने २८ जानेवारी रोजी याबाबतचे वृत्त दिले होते.
नियुक्त केलेल्यांमध्ये मद्रासचे मुख्य न्या. संजय किशन कौल, राजस्थानचे मुख्य न्या. नवीन सिन्हा, केरळचे मुख्य न्या. मोहन एम. शांतनगौडर, छत्तीसगडचे मुख्य न्या. दीपक गुप्ता व कर्नाटकचे न्या. एस. अब्दुल नजीर आहेत. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींची ३१ मंजूर पदे असताना २३ न्यायमूर्तीच असून, आता ती २८ होईल. उर्वरित ३ नावांसाठी कॉलेजियमची लवकरच बैठक होईल.
माजी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि मोदी यांचे जमत नसल्याने न्यायालयांतील नियुक्त्या रखडल्या होत्या. उच्च न्यायालयांतील रिक्त पदेही लवकरच भरली जातील. उच्च न्यायालयांत जवळपास १५२ पदे रिक्त आहेत.
नव्या सरन्यायाधीशांशी संबंध सुधारण्यासाठी मोदींनी नववर्षदिनी त्यांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या होत्या. राष्ट्रपती भवनातील मेजवानीतही त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. गेल्या २५ दिवसांत ते तीनहून अधिक वेळा भेटले आहेत. सरन्यायाधीश खेहर हे कामसू, कडक शिस्तीचे असून प्रकाश झोतात राहणे त्यांना आवडत नाही.