चोरीचा नवा फॉर्म्युला, बुद्धिमान चोरानं अॅमेझॉनला लावला अशा प्रकारे लाखोंचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 02:14 PM2017-10-11T14:14:11+5:302017-10-11T14:15:51+5:30
21 वर्षांच्या एका उच्चविद्याविभूषित तरुणानं स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ऑनलाइन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनला लाखोंचा गंडा घातला आहे.
नवी दिल्ली- 21 वर्षांच्या एका उच्चविद्याविभूषित तरुणानं स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ऑनलाइन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनला लाखोंचा गंडा घातला आहे. शिवम चोपडा नावाच्या तरुणानं अॅमेझॉनवरून 166हून अधिक महाग मोबाईल खरेदी केले आणि मोबाईलचा बॉक्स रिकामी असल्याचं कारण देत अॅमेझॉनकडून रिफंडही घेतलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवम या तरुणानं यंदा एप्रिल ते मे या दोन महिन्यांदरम्यान जवळपास 50 लाख रुपये कमावले आहेत. ज्या वेळी अॅमेझॉनला या चोरीचा थांगपत्ता लागला, त्यावेळी कंपनीनं पोलिसांत तक्रार केली. शिवम या तरुणानं रोहिणी येथून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. तसेच तो नोकरीलासुद्धा होता. परंतु शिवम त्याच्या नोकरीवर संतुष्ट नव्हता. त्यामुळे त्याने नोकरी सोडली. याच वर्षी मार्च महिन्यात त्यांच्या डोक्यातून एक सुप्त कल्पना जन्माला आली व त्याने एक प्रयोग करून पाहिला. पहिल्यांदा त्यानं अॅमेझॉनवरून दोन फोनची ऑर्डर दिली. त्यानंतर रिफंडही घेतला. त्यानंतर त्यानं दोन महिन्यात अॅपल, सॅमसंग, वन प्लस सारखे अनेक महागडे मोबाईल ऑनलाइन ऑर्डर केले व त्यांचे रिफंडही घेतले. फोन मिळाल्यानंतर शिवम ते मोबाइल ओएलएक्स वेबसाइट, गफ्फार मार्केटमध्ये जाऊन विकत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार शिवमनं केलेले ऑर्डर 60 लाखांहून अधिकचे होते. तसेच त्यानं फसवणूक करण्यासाठी त्रिनगरमधील निवासी सचिन जैनकडून बनावट सिम कार्ड विकत घेतलं होतं. सचिननं शिवमला जवळपास 141 प्री अॅक्टिवेट सिम दिले आणि शिवमनं त्या सिम कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या पत्त्यांवर मोबाइल फोनची ऑर्डर मागवली. सचिन प्रत्येक सिमकार्ड मागे 150 रुपये घेत होता. शिवम या मोबाइल नंबरचा वापर ऑर्डर देण्यासाठी करत असे. आरोपी बोगस सिम कार्डच्या माध्यमातून किमती फोनची ऑर्डर देत होता. आणि वस्तू आल्यानंतर बॉक्समध्ये मोबाइल नसल्याचं कारण देत रिफंडही घेत होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद डुंबरे यांनी सांगितलं की, आरोपींची ओळख शिवम चौपडा आणि सचिन जैन अशी झाली आहे. गेल्या 17 ऑगस्टला अॅमेझॉन शॉपिंग कंपनीच्या एका अधिका-यानं केशवपुरम पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी शिवम चोपडा याच्या घरातून 19 मोबाइल फोन, 12 लाख रुपये रोख व 40 बँक पासबुक व चेकबुक जप्त केले आहेत.