नवे सरकार दिवाळीआधी!
By admin | Published: September 13, 2014 04:52 AM2014-09-13T04:52:34+5:302014-09-13T04:52:34+5:30
महाराष्ट्राची १२वी विधानसभा निवडण्यासाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने शुक्रवारी
नवी दिल्ली : महाराष्ट्राची १२वी विधानसभा निवडण्यासाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने शुक्रवारी केल्याने दिवाळीच्या चार दिवस आधीच राज्यात नवे सरकार सत्तेवर येईल, हे स्पष्ट झाले. ज्येष्ठ भाजपा नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातही विधानसभेसोबतच निवडणूक होणार आहे.
आचारसंहिताही तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही निर्णय घेण्यास वा तशा घोषणा करण्यास राज्य तसेच केंद्र सरकारवर निर्बंध आले आहेत.
राज्याच्या विद्यमान विधानसभेची मुदत येत्या ८ नोव्हेंबर रोजी संपत आहे. एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८पैकी ४२ जागा मतदारांनी भाजपा-शिवसेना युतीच्या झोळीत टाकल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखेविषयी कमालीची उत्सुकता होती. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत आणि निवडणूक आयुक्त एस. एच. ब्रह्मा व डॉ. नसिम झैदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करून अनिश्चितता संपुष्टात आणली.
राज्य विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांत १५ आॅक्टोबर या एकाच दिवशी स. ७ ते सा. ५ या वेळात मतदान घेतले जाईल. १९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होईल व लोकसभा निवडणुकीत आलेली मोदी सुनामी अद्याप कायम आहे की चार महिन्यांतच ती ओसरली हे त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. या निवडणुकीतराज्यातील आठ कोटी २५ लाखांहून अधिक मतदार मतदार करू शकतील. त्यांच्यासाठी ९० हजार ४०३ मतदान केंद्रांची सज्जता केली जाणार आहे. आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम पाहता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया जेमतेम एक महिन्यात पूर्ण होईल. २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या आठवडाभरात उमेदवारी अर्ज भरायचे असल्याने सत्ताधारी आघाडी व सत्ताकांक्षी महायुती या दोघांनाही एकत्र राहायचे की काडीमोड घ्यायचा याच्या निर्णयासह मतदारसंघ व उमेदवार ठरविण्याचे बिकट काम येत्या काही दिवसांत लगबगीने उरकावे लागणार आहे. याआधी २००९ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक १३ आॅक्टोबर रोजी झाली होती व २२ आॅक्टोबर रोजी निकाल जाहीर झाले होते. त्या तुलनेत यावेळी निवडणूक दोन दिवस नंतर होईल व निकाल तीन दिवस आधी लागतील. (विशेष प्रतिनिधी)