झारखंडमध्ये डिसेंबरमध्येच नवे सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 02:15 AM2019-09-22T02:15:11+5:302019-09-22T02:15:29+5:30
ऑक्टोबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
- धनाजी कांबळे
रांची : महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा एकाच वेळी होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र झारखंडमधील निवडणूक आॅक्टोबरमध्ये जाहीर केली जाईल आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० पर्यंत आहे. ८१ जागांसाठी या राज्यात निवडणूक होते. भाजपला २०१४ मध्ये ३७ जागा मिळाल्या होत्या. तसेच झाविमोचे ६ आमदार भाजपमध्ये गेले होते. झारखंड मुक्ती मोर्चाला १९ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या. झारखंड विकास मोर्चाला ८ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यातील ६ जणांनी भाजपला पाठिंबा दिल्याने केवळ दोनच जागा त्यांच्याकडे राहिल्या होत्या. भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच झारखंडचा दौरा केला.
पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री
सन २००० मध्ये १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी झारखंडची स्थापना झाली. पहिल्या मुख्यमंत्र्यापासून आदिवासी समाजाला प्राधान्य दिल्याचे दिसते. सध्याचे झारखंड विकास मोर्चाचे सर्वेसर्वा पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी हे तेव्हा भाजपचे मोठे नेते मानले जात होते.
त्यानंतर अर्जुन मुंडा, शिबू सोरेन, मधू कोडा आणि हेमंत सोरेन हेदेखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत. भाजपच्या बहुमतावर सरकार चालवणारे सध्याचे मुख्यमंत्री रघुबर दास हे पहिले बिगर आदिवासी आहेत.