रोजगारपूरक विकास अन् राष्ट्रवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू- राजन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 07:41 PM2019-04-10T19:41:02+5:302019-04-10T19:43:12+5:30
भविष्यात रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार; राजन यांचं विश्लेषण
नवी दिल्ली: रोजगार देणारा आर्थिक विकास आणि राष्ट्रवाद हे दोन वेगवेगळे मुद्दे नसून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. येत्या काळात रोजगार निर्माण करणारा आर्थिक विकास न झाल्यास देशाला अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. टाईम्स ऑफ इंडियासाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. बांधकाम क्षेत्रात येत्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं.
आर्थिक आघाडीवर अपयश आल्यास काय काय होऊ शकतं, हे राजन यांनी लेखात स्पष्ट केलं. 'आर्थिक विकास साधण्यात अपयशी ठरल्यास आपल्याकडे सैन्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रं नसतील. देशावर हल्ला करुन पळून गेलेल्या दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण घडवून आणण्याची क्षमता नसेल,' असं राजन यांनी लेखात नमूद केलं आहे. 'आपण रोजगारनिर्मिती करणारा आर्थिक विकास करण्यात अपयशी ठरल्यास देशात भूकंपासारखी परिस्थिती निर्माण होईल. कारण त्यामुळे देशातील तरुण पिढी तणावाखाली असेल. त्यांच्याकडून कुठे ना कुठे हा तणाव काढला जाईल,' अशी भीती त्यांनी व्यक्त केली. रोजगार निर्माण करणाऱ्या आर्थिक विकासाशिवाय राष्ट्रीय सुरक्षा शक्य नाही, असं मत राजन यांनी व्यक्त केलं.
राजन यांनी त्यांच्या लेखात येत्या काळात कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या निर्माण होतील, याचंही विश्लेषण केलं आहे. 'रोजगार वाढवण्यासाठी आपल्याला आर्थिक विकास दराचा वेग वाढवावा लागेल. रोजगार देणाऱ्या क्षेत्रांकडे लक्ष केंद्रीत करावं लागेल. बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. परवडणारी घरं, रस्ते, रेल्वे, बंदरं, विमानतळांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात अर्धकुशल कामगारांची आवश्यकता भासेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. मात्र जमीन अधिग्रहणच्या किचकट प्रक्रियेमुळे हा क्षेत्राला गती मिळत नाही,' असं राजन यांनी लेखात म्हटलं आहे.