निवडणुका होणाऱ्या ९ राज्यांत नवे राज्यपाल, जाणून घ्या कुठे झाला बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:51 AM2023-02-13T10:51:58+5:302023-02-13T10:52:44+5:30

अनेक ठिकाणी जनतेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार

New governors in 9 states where elections will be held, know where the change took place | निवडणुका होणाऱ्या ९ राज्यांत नवे राज्यपाल, जाणून घ्या कुठे झाला बदल

निवडणुका होणाऱ्या ९ राज्यांत नवे राज्यपाल, जाणून घ्या कुठे झाला बदल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने रविवारी १३ राज्यांतील राज्यपाल आणि नायब राज्यपाल बदलले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या १३ राज्यांमध्ये राज्यपाल आणि नायब राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यापैकी नऊ राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

या नऊ राज्यांमध्ये खांदेपालट यंदा देशातील नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यापैकी त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोराम या चार ईशान्येकडील राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचवेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन मोठ्या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. कर्नाटक आणि तेलंगणामध्येही यंदा निवडणुका आहेत. बिहारमध्ये नवीन राज्यपाल नियुक्तीच्या घोषणेनंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

असे आहेत नवनियुक्त राज्यपाल

अब्दुल नजीर : अयोध्येतील ऐतिहासिक राममंदिराच्या निकालात सहभाग
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनविण्यात आले आहे. ते ४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. अवघ्या ४० दिवसांतच ते राज्यपाल झाले. न्यायमूर्ती नझीर राममंदिरावर निकाल देणाऱ्या खंडपीठाचा भाग होते. त्यांनी मंदिराच्या बांधकामाच्या बाजूने निकाल दिला. ते तिहेरी तलाक आणि नोटाबंदीसारख्या प्रकरणांवर निर्णय घेणाऱ्या खंडपीठांमध्येही सामील होते.

रमेश बैस : सातवेळा खासदारांकडे सोपविण्यात 
आली महाराष्ट्राची धुरा   
रमेश बैस हे छत्तीसगड भाजपचे दिग्गज नेते आहेत. ते सलग सातवेळा खासदार राहिले आहेत. याआधी ते त्रिपुरा आणि झारखंडचे राज्यपाल राहिले आहेत. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा सोपविण्यात आली आहे. बैस यांनी हेमंत सोरेन सरकारचे झारखंड वित्त विधेयक २०२२मध्ये परत केले होते. त्याचवेळी हेमंत सोरेन यांच्या निवडीसंदर्भातील त्यांच्या वक्तव्यावरून बराच वाद झाला होता.

निवृत्त ब्रिगेडियर मिश्रा : लडाखमध्ये नियुक्ती
निवृत्त ब्रिगेडियर डॉ. बी.डी. मिश्रा यांना लडाखचे नायब राज्यपाल बनवण्यात आले आहे. याआधी ते अरुणाचल प्रदेश आणि मेघालयचे राज्यपाल होते. मिश्रा ३१ जुलै १९९५ रोजी लष्करातून निवृत्त झाले. ते एनएसजी (ब्लॅक कॅट कमांडो) काैंटर हायजॅक टास्क फोर्सचे कमांडर होते, ज्याने २४ एप्रिल १९९३ रोजी राजा सांसी एअरफील्ड, अमृतसर येथे अपहृत इंडियन एअरलाइन्सच्या विमानाची दहशतवाद्यांपासून सुटका केली. १९६२ चे भारत- चीन युद्ध, नागालँडमधील नागा बंडखोरांविरुद्ध १९६४, सियालकोटमध्ये पाकविरुद्ध (१९६५) प्रमुख भूमिका निभावली. 

अनुसया उईके : 
छत्तीसगडमधून उचलबांगडी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या छत्तीसगड दौऱ्यानंतर एका दिवसानंतर राज्यपाल अनुसया उईके यांना हटवण्यात आले आहे. त्यांना मणिपूरचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या उईके यांची सरकारने १६ जुलै २०१९ रोजी छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. बरोबर एक महिन्यानंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या नव्या सरकारने काम सुरू केले. उईके यांनी आरक्षण दुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी मार्चची तारीख निश्चित केली होती.

एल.ए. गणेशन : 
नागालँडमध्ये राज्यपाल
मणिपूरचे राज्यपाल एल.ए. गणेशन यांना नागालँडचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. गणेशन यांनी १८ जुलै २०२२ ते १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे. तामिळनाडूचे वरिष्ठ भाजप नेते गणेशन २०२२ च्या ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर सुनील छेत्रीला स्टेजवर ट्रॉफीसह पोज देण्यासाठी ढकलताना दिसले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. 


फागू चौहान : चार पक्षांचा अनुभव, मेघालयचे राज्यपाल
बिहारचे ४० वे राज्यपाल बनलेले फागू  चौहान यांना आता मेघालयची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या १७व्या विधानसभेच्या निवडणुकीत घोसी येथून सर्वाधिक मतांनी ते विजयी झाले होते. १९८५ मध्ये पहिल्यांदा दलित किसान मजदूर पक्षाचे आमदार झाले. १९९१ मध्ये जनता दलाचे आमदार निवडून आले. त्यानंतर १९९६ आणि २००२ मध्ये ते आमदार झाले. २००७ मध्ये त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली. २०१७ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढत आमदार झाले.

 

Web Title: New governors in 9 states where elections will be held, know where the change took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.