महाराष्ट्रासह अनेक राज्यांत नवे राज्यपाल? PM मोदींनी बोलावली मंत्रिमंडळ बैठक; मोठा फेरबदल शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 06:31 AM2023-01-28T06:31:15+5:302023-01-28T06:31:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ७५ सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक ३१ जानेवारीच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या आठवड्याच्या अखेरीस बोलावली आहे.
हरिश गुप्ता
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ७५ सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक ३१ जानेवारीच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या आठवड्याच्या अखेरीस बोलावली आहे. मोठ्या फेरबदलापूर्वी ही विद्यमान मंत्रिमंडळाची अखेरची बैठक असू शकते, अशी साऊथ ब्लॉकमध्ये चर्चा आहे. अनेक राज्यांत नवीन राज्यपाल व उपराज्यपालांच्या नियुक्त्या व भाजपमधील बदल एकाचवेळी होऊ शकतात, असे समजते.
सूत्रांनी सांगितले की, टीम-मोदीमध्ये २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा फेरबदल होऊ घातला असून, त्याबाबत सहकारी मंत्र्यांना खडे बोल सुनावण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. मोदी आपल्या वॉर-टीमला अंतिम स्वरूप देत असून, कमी कार्यक्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविला
जाऊ शकतो.
मंत्रिमंडळाच्या या बैठकीच्या अजेंड्याबाबत कोणालाही माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, तुमच्या कार्यक्षमतेवर बारीक नजर ठेवली जात आहे, असे मोदींनी मंत्र्यांना काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. या बैठकीत त्यांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्र्यांमध्ये सध्या अस्वस्थता आहे.
कमजोर असलेल्या जागांची संख्या वाढली
भाजपने एक सर्वेक्षण केलेले असून, त्यात पक्ष कमजोर असलेल्या लोकसभेच्या जागांची संख्या १४४ वरून १७० गेल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ व आणखी काही महत्त्वाच्या राज्यांतील ही स्थिती आहे. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री सध्या भाजपचे उपाध्यक्ष असून, त्यांना प्रजासत्ताक दिनी पक्ष मुख्यालयात तिरंगा फडकावण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. यावरून सर्व काही स्पष्ट होते.
राज्यात कोण येणार; १५ दिवसांत ठरणार?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदमुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्यानंतर आता नवीन राज्यपाल कोण येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या १५ दिवसांत नवीन राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
राजस्थान भाजपमधील वजनदार नेते ओम माथुर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, राज्यसभा सदस्य राहिलेले मध्य प्रदेशातील भाजपचे नेते प्रभात झा, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची नावे चर्चेत आहेत. माथूर हे २०१४च्या निवडणुकीत महाराष्ट्र भाजपचे प्रभारी राहिले आहेत. राज्यातील भाजपच्या नेत्यांशी त्यांचे स्रेहपूर्ण संबंध आहेत. सुमित्रा महाजन मध्य प्रदेशातील असल्या तरी मराठी आहेत आणि त्यांचे माहेर मुंबई आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेले अमरिंदरसिंग हे भाजपचे पंजाबमधील नेते आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणूक दीड-दोन वर्षांवर असताना भाजप परिवारातील व्यक्तीची आणि त्यातही महाराष्ट्राची माहिती असलेल्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून संधी दिली जाऊ शकते. राज्यात कोण येणार? याची चर्चा आता रंगली आहे.