जागतिक आरोग्य संघटनेने जारी केल्या मास्क वापराबाबत नव्या मार्गदर्शक सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:02 AM2020-06-08T05:02:33+5:302020-06-08T05:02:41+5:30
फक्त मास्कने सुरक्षित राहता येणार नाही
मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जगभरातील लोक चेहऱ्यावर मास्क लावत आहेत. प्रत्येक देशाचे सरकार आपापल्या देशातील नागरिकांना सुरुवातीपासूनच कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मास्क वापरायचं आवाहन करत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने मास्कबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने नव्या गाइडलाइन्समध्ये कुणी-कधी मास्क वापरावे, मास्क कशाचे तयार केले असावेत, याबाबत माहिती जारी केली आहे. ‘ज्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागात मास्क घालणं बंधनकारक आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणीदेखील आवर्जून मास्क वापरावे, यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होईल’, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
फक्त मास्कने सुरक्षित राहता येणार नाही
च्मास्क वापरल्याने लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र, मास्क वापरल्याने संसर्गाचा धोका कमी असतो, असे जागतिक आरोग्य संघटेनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम म्हणाले आहेत. कोरोनाच्या रुग्णाची माहिती काढणे आणि त्याला आयसोलेट करणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णाच्या क्लोज कॉन्टॅक्टमधील लोकांना क्वारंटाइन करायला हवे. हाच एक कोरोना महामारीविरोधात लढण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे', असेही टेड्रोस अदनोम म्हणाले.
अशा असतील नव्या गाइडलाइन्स
कोरोनाचं संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेल्या परिसरात सरकारने सर्व नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करावे.
सार्वजनिक ठिकाणी, दुकानं आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य करावे.
कम्युनिटी ट्रान्समिशन ज्या भागात झालं आहे त्या भागात ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांनी मेडिकल मास्क घालावे.