अब दिल्ली दूर नही! नव्या मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस-वेमुळे २४ तासांचा प्रवास होणार १२ तासांत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 09:12 AM2018-04-17T09:12:03+5:302018-04-17T09:12:03+5:30
प्रकल्पासाठी एकुण 60 हजार कोटी रुपये खर्च होईल.
नवी दिल्ली- गुरूग्राम आणि मुंबईला जोडणारा नवा एक्स्प्रेस वे पुढील 3 वर्षात बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. दिल्ली-गुरुग्राम-मेवात, कोटा अलवर-सवाई माधोपुर-बडोदाच्या मार्गे मुंबईपर्यंत हा एक्सप्रेस वे असणार असल्याची माहिती मिळते आहे. या प्रकल्पासाठी एकुण 60 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
दिल्ली ते मुंबई या नव्या एक्स्प्रेस वेमुळे दोन्ही ठिकाणांमधील अंतर अर्ध्याहून जास्त कमी होणार आहे. मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी सध्या 1450 किलोमीटरचं अंतर आहे. नव्या एक्स्प्रेस वेमुळे हे अंतर कमी होऊन 1250 किलोमीटर होणार आहे. म्हणजेच आता जो २४ तासांचा वेळ या प्रवासासाठी लागतो तो वेळ कमी होऊन 12 तासावर येईल. डिसेंबर महिन्यात या एक्स्प्रेस वेचं काम सुरू होणार असून तीन वर्षात हे काम पूर्ण होईल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील अनेक दुर्गम किंवा आदिवासी भाग या एक्स्प्रेस वेमुळे जोडले जातील, त्यामुळे या भागांचा मोठा विकास होईल, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली आहे.