82 कोटीच्या जागेवर पेटीएमच्या मालकाचं नवं घर
By admin | Published: June 7, 2017 11:20 AM2017-06-07T11:20:23+5:302017-06-07T11:41:56+5:30
पेटीएमचे संस्थापक आणि डिजीटल क्षेत्रातील उद्योजक विजय शेखर शर्मा तब्बल 82 कोटींची निवासी मालमत्ता विकत घेत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळूरू, दि. 7- पेटीएमचे संस्थापक आणि डिजीटल क्षेत्रातील उद्योजक विजय शेखर शर्मा तब्बल 82 कोटींची निवासी मालमत्ता विकत घेत आहेत. नवी दिल्लीतील गोल्फ लिंक या सगळ्यात महागड्या ठिकाणी ही जागा विजय शर्मा विकत घेत आहेत.
शर्मा यांची नवी जागा तब्बल सहा हजार स्क्वेअर फुट इतकी आहे. या जागेसाठीची अॅडव्हान्स किंमत दिली असून एमओयूवरसुद्धा स्वाक्षरी झाली आहे. पण या व्यवहाराची अजून अधिकृत नोंदणी झालेली नाही. या सहा हजार स्क्वेअर फुटांच्या जागेवर नवीन घर बांधायच्या विचारात विजय शर्मा आहेत.
याआधी विजय शर्मा आणि फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी आणि सचिन बंसल यांनी बंगळुरूमध्ये अशी महागडी गुंतवणूक केली आहे. पण या संदर्भात पेटीएमच्या कोणत्याही प्रवक्त्यानं अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.
पेटीएमने नुकतंच जपानच्या सॉफ्ट बँकेच्या माध्यमातून 1.4 अब्ज रूपयांची कमाई केली आहे, यापैकी 16 टक्के भाग विजय शर्मा यांचा आहे. भारतीय स्टार्टअप असलेल्या व्यवसायामध्ये हा सर्वात मोठा मिळालेला निधी आहे. तसंच विजय शर्मा यांच्याकडे पेटीएम पेमेंट बँकेचे 51 टक्के शेअरसुद्धा आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तीच्या यादीतही विजय शर्मा यांचा तरूण भारतीय अब्जाधीश व्यक्ती म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
शर्मा यांनी विकत घेतलेली जागा रिअल इस्टेट वर्तुळात फार मोठी नसली तरी एका इंटरनेट अब्जाधीशाचा लुटियन झोनमध्ये प्रवेश मानला जातो आहे.