ही नव्या भारताची नांदी
By Admin | Published: March 13, 2017 04:36 AM2017-03-13T04:36:35+5:302017-03-13T04:36:35+5:30
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ही नव्या भारताची नांदी आहे. या राज्यांमधील विजयाने भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आणखी वाढली आहे.
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ही नव्या भारताची नांदी आहे. या राज्यांमधील विजयाने भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आणखी वाढली आहे. आपण आणि पक्षाने गेल्या लोकसभा निवडणुकीपासून घेतलेला लोकसेवेचा वसा प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही तो तसाच सुरु राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे दिली.
भाजपाच्या राष्ट्रीय मुख्यालयात आयोजित विजयोत्सवात बोलताना मोदी म्हणाले की, कोण जिंकले, कोण हरले या दृष्टिने निवडणुकांकडे पाहणाऱ्यांपैकी मी नाही. माझ्या मते निवडणका हे लोकशिक्षणाचे महापर्व आहे. निवडणुकांमुळे जनतेची लोकशाहीशी प्रतिबद्धता अधिक दृढ होते व राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात जनतेची भागिदारी वाढते. या दृष्टीने पाहिले तर निवडणुकीतील कौल हा भाजपाला जनतेने दिलेला पवित्र आदेश आहे. या आदेशाचे पालन करून जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रामाणिक प्रयत्न करणे हे माझे व पक्षाचे कर्तव्य आहे, असे मी मानतो.
पंतप्रधान म्हणाले की, तरूणांच्या स्वप्नातला भारत, नव्या संधीच्या शोधात असलेला गरीब, समाज जीवनाविषयी जागरूक असलेल्या महिला आणि राष्ट्र उभारणीत प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची जिद्द असलेल्या मध्यमवर्गाच्या बळावर, नव्या बलशाली भारताचे (न्यू इंडियाचे) स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याचे मी अनुभवतो आहे. उत्तरप्रदेश हे देशाला प्रेरणा अन् शक्ती देणारे देशातले सर्वात मोठे राज्य आहे. या राज्याने भाजपवर व्यक्त केलेला विश्वास नव्या हिंदुस्तानची पायाभरणी करणारा आहे.
खास करून उत्तर प्रदेशातील विजय हा भाजपाच्या दृष्टीने भावनात्मक आहे कारण यंदाचे वर्ष जनसंघाचे एक संस्थापक पं. दीन दयाल उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या ‘अंत्योदय’ मंत्राची पूर्तता करणयाची संधी या वर्षात आम्हाला मिळाली हे आमचे भाग्य आहे. भाजपला मिळालेले यश ही खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वप्नातल्या भारताला, कार्यक र्त्यांनी कृतज्ञतेने अर्पण केलेली आदरांजली आहे.
निवडणुका केवळ सरकार बनवण्यासाठी नसतात तर मानवतेच्या कल्याणासाठी लोकशिक्षण घडवणारे ते महापर्व असते. मतदारांचे कर्तव्य मतदानापुरते सीमित नसून राष्ट्र उभारणीत त्यांची भागीदारी वाढली पाहिजे. राजकीय पक्षांखेरीज सामान्य जनता देखील या प्रक्रियेत दिवसेंदिवस उत्साहाने सहभागी होते आहे हा लोकशाहीतला शुभसंकेत आहे. इतकेच नव्हे तर अकल्पनीय मतदानानंतर भाजपला मिळालेला हा अकल्पनीय विजय तमाम राजकीय पंडितांना विचार करायला लावणारा आहे. जगाच्या पाठीवर भाजपला सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला राजकीय पक्ष बनवल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व त्यांच्या राष्ट्रीय टीमचा यावेळी पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
प्रास्ताविक भाषणात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तरप्रदेश, उत्तराखंडासह देशातल्या चार राज्यात भाजपचेच सरकार सत्तेवरा येणार असल्याची सुरूवातीलाच घोषणा केली.
स्वातंत्र्यानंतर देशातला सर्वाधिक लोकप्रिय नेत्याचे स्थान पंतप्रधान मोदींनी मिळवले आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करतांना शाह म्हणाले, देशातल्या गरीब जनतेच्या मनात मोदींविषयी अपार श्रध्दा आहे. मोदींनी मिळविलेली ही श्रद्धा हिच पक्षाची सर्वात मोठी ठेव आहे. या श्रध्देला आणि विश्वासाला सार्थ ठरणारे काम आमच्या हातून होईल.
हा जनतेचा पवित्र आदेश
भावनाप्रधान मुद्यांवर अनेकदा निवडणुका लढवल्या जातात मात्र विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणे सर्वात अवघड असते.
पाच राज्यांच्या निवडणुकीत यंदा कोणताही भावनात्मक मुद्दा नव्हता तरीही देशाच्या विकासाचे स्वप्न पहात इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केले व भाजपला विजयी केले यात नव्या हिंदुस्तानच्या आशाआकांक्षांचे दर्शन मला घडते आहे. सत्ता केवळ पदाची शोभा वाढवण्यासाठी नाही तर ती सेवेची संधी आहे.
लक्षावधी कार्यकर्त्यांच्या अविरत
कष्टातून, पुरूषार्थातून भाजपला ती मिळाली आहे. हा अभूतपूर्व विजय जनता जनार्दनाने आपल्याला दिलेला पवित्र आदेश आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
भाजपच्या विजयाची ही यात्रा उत्तर प्रदेश व उत्तराखंडापुरती मर्यादीत नाही. यंदा गुजरात, हिमाचल, कर्नाटकसह दक्षिणेकडील राज्यांमधे विजयाचा झेंडा फडकवीत पुढल्या वर्षी पश्चिम भारतातल्या राज्यात हा विजयरथ धडकेल व अंतत: २0१९ साली २0१४ पेक्षाही मोठा विजय आम्ही संपादन करू. - अमित शहा