कुपोषणविरोधी योजनांच्या पाहणीसाठी नवी निरीक्षण पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 05:01 AM2019-07-01T05:01:58+5:302019-07-01T05:08:50+5:30

पंतप्रधान मातृवंदना योजनेचा आढावा इंटरनेटच्या माध्यमातून व्यवस्थापन व माहिती (एमआयएस) सॉफ्टवेअरद्वारे घेतला जातो.

 New inspection procedures for anti-malnourishment plans | कुपोषणविरोधी योजनांच्या पाहणीसाठी नवी निरीक्षण पद्धती

कुपोषणविरोधी योजनांच्या पाहणीसाठी नवी निरीक्षण पद्धती

Next

नवी दिल्ली : महिला, बालके यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याकरिता असलेल्या योजनांच्या फलश्रुतीची तपासणी करण्यासाठी नवी निरीक्षण पद्धती केंद्र सरकारने अमलात आणली आहे.
यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, पोषण अभियान, पंतप्रधान मातृवंदना योजना, अंगणवाडी योजनांची नीट अंमलबजावणी झाली की नाही याची पाहणी केली जाणार आहे. पोषण अभियानाच्या फलश्रुतीचा नीती आयोगाकडून ठराविक कालावधीनंतर आढावा घेतला जातो. पोषण अभियानाची नियमितपणे ही पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय पोषण संसाधने केंद्र - केंद्रीय प्रकल्प निरीक्षण विभागाची (एनएनआरसी-सीपीएमयू) स्थापना करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत जे कार्यक्रम हाती घेतले जातात त्यांचा आढावा या विभागातर्फे घेण्यात येतो.
पंतप्रधान मातृवंदना योजनेचा आढावा इंटरनेटच्या माध्यमातून व्यवस्थापन व माहिती (एमआयएस) सॉफ्टवेअरद्वारे घेतला जातो. त्याचप्रमाणे अंगणवाडी योजनेची नीट अंमलबजावणी होते आहे की नाही हे पाहण्यासाठी एक निरीक्षण पद्धती कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेसंदर्भात हाती आलेल्या माहितीची एमआयएसच्या माध्यमातून खातरजमा केली जाते.
अंगणवाडी योजनेचा आढावा घेण्यासाठी अंगणवाडी, ब्लॉक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारने विशिष्ट प्रकारची निरीक्षण पद्धती लागू केली आहे.
किशोरवयीन मुलींसाठी राबविलेल्या योजनांची गाव, ब्लॉक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर पाहणी करण्यात येते. त्याशिवाय अन्य योजनांचा बैठका व व्हिडिओ कॉन्फरन्स यांच्या माध्यमातून आढावा घेतला जातो.

भारतात ४.४६ कोटी कुपोषित बालके
- जगातील एकूण कुपोषित मुलांपैकी एक तृतीयांश जण एकट्या भारतातच असल्याचे २०१८च्या जागतिक पोषण अहवालामध्ये म्हटले आहे.
- भारतात कुपोषित मुलांची संख्या ४.६६ कोटी असून याबाबतच्या जागतिक यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर नायजेरियामध्ये १.३९ कोटी, पाकिस्तान १.७ कोटी कुपोषित बालके आहेत.

Web Title:  New inspection procedures for anti-malnourishment plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत