रेल्वेतील हमालांना मिळणार नवी ओळख
By admin | Published: February 12, 2016 04:06 AM2016-02-12T04:06:26+5:302016-02-12T04:06:26+5:30
रेल्वे स्थानकांवर लाल डगले घातलेले बिल्लेधारी हमाल प्रवाशांच्या लगेजची अवजड ओझी डोक्यावर आणि खांद्यावर घेऊन जात असल्याचे सर्वांना परिचित असलेले चित्र
नवी दिल्ली : रेल्वे स्थानकांवर लाल डगले घातलेले बिल्लेधारी हमाल प्रवाशांच्या लगेजची अवजड ओझी डोक्यावर आणि खांद्यावर घेऊन जात असल्याचे सर्वांना परिचित असलेले चित्र आता इतिहासजमा होणार आहे. डोक्यावरून सामान वाहून नेण्याऐवजी रेल्वे स्थानकांवरील या हमालांना विमानतळांवर असतात तशा ट्रॉलीज देण्याची रेल्वेची योजना आहे.‘कुली’ किंवा ‘हमाल’ हे वसाहतवादी काळातील हीनतादर्शक नाव बदलून त्यांना ‘लगेज असिस्टंट’ अशी नवी ओळख देण्याचेही रेल्वेचे प्रयत्न आहेत. रेल्वेमंत्री रमेश प्रभू आगामी रेल्वे अर्थसंकल्पात याविषयीचा तपशील जाहीर करण्याची अपेक्षा आहे.
लाल रंगाच्या गबाळ्या गणवेशाऐवजी रेल्वे स्थानकांवरील हमालांनी अधिक रुबाबदार गणवेश देऊन त्यावर खेळाडूंच्या ड्रेसवर असतात तशा जाहिराती प्रदर्शित करण्याचाही रेल्वेचा विचार आहे. यातून महसुलात भर टाकण्याचा रेल्वेचा उद्देश आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी रेल्वेला क्रिकेटकडून शिकण्याचा सल्ला दिला होता.
स्टंपवरही जाहिराती करून पैसा उभारणाऱ्या क्रिकेटकडून बरेच काही शिकता येईल, असे मोदी म्हणाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एकट्या दिल्लीतील चार प्रमुख रेल्वे स्थानकांवर २,१७६ परवानाधारक हमाल आहेत. संपूर्ण देशभरातील त्यांची संख्या लक्षात घेता, अद्यापपर्यंत दुर्लक्षित राहिलेला हा वर्ग रेल्वेला मोठा महसूल मिळवून देऊ शकतो. तूर्तास टप्प्याटप्प्याने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यानुसार जाहिरातदारांशी करार केला जाणार आहे.