खबरदार! आजपासून वाहतुकीचे नियम मोडल्यास 15 हजारापर्यंत दंड तर 2 वर्षाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 10:21 AM2019-09-01T10:21:21+5:302019-09-01T10:22:19+5:30
जर तुम्ही विना परवाना गाडी चालवित असाल तर 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
नवी दिल्ली - कार, बाईक चालविताना आजपासून जर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. त्यामुळे तुम्ही केलेला गुन्हा तुमच्यासाठी नुकसानकारक असणार आहे. नवीन कायद्यातंर्गत वाहतुकीचे नियम मोडल्यास जवळपास 30 पटीने अधिक दंड वाढविण्यात आला आहे.
जर तुम्ही विना परवाना गाडी चालवित असाल तर 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. त्याचसोबत दारुच्या नशेत गाडी चालविली तर 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर हे नियम मोडल्यामुळे तुमचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला जेलची हवा खावी लागणार आहे. जर अल्पवयीन मुलाने गाडी चालवून अपघात केल्यास, त्याच्या पालकांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तसेच त्या वाहनाची नोंदणीही रद्द केली जाणार आहे.
- सामान्य दंडाची रक्कम - पूर्वी 100 रुपयांवरून आता 500 रुपये
- हेल्मेट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये दंड आणि 3 महिने परवाना निलंबित
- विना परवाना गाडी चालविणे - पूर्वी 500 रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये
- दुचाकीवर तीन जणांनी प्रवास केला तर पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 2 हजार रुपये दंड आणि 3 महिने वाहन परवाना निलंबित करण्याची शिक्षा
- सीट बेल्ट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये
- वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - पूर्वी 1 हजार रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये
- भरधाव वेगाने वाहन चालविल्यास - पूर्वी 400 रुपये दंड होता तर आता पहिल्यांदा पकडल्यास हलक्या वाहनांवर 1 ते 2 हजार रुपये दंड तर जड वाहनांना 2 ते 4 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, आणि दुसऱ्यांदा पकडल्यास परवाना जप्त करण्यात येणार आहे.
- रॅश ड्रायव्हिंग - पहिल्यांदा 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत जेल आणि 1 हजार ते 5 हजार दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्षापर्यंत जेल आणि 10 हजार रुपये दंड
- दंडाची तरतूद दारू पिऊन गाडी चालविल्यास - पहिल्यांदा 6 महिने जेल आणि 10 हजार रुपये दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्ष जेल आणि 15 हजार रुपये दंड