लोकसभा निवडणुकांच्या घोषणेआधी नवा ओपिनियन पोल समोर; देशात कुणाचं पारडं जड?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 01:02 AM2024-03-13T01:02:18+5:302024-03-13T01:04:35+5:30
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नक्की कोणाचं पारडं जड राहणार, याबाबतची उत्सुकता देशभरात निर्माण झाली आहे.
Lok Sabha Elections ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात देशभरात सध्या सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून मित्रपक्षांमधील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच काही जागांवर उमेदवारांची नावेही निश्चित करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे, सरकारविरोधी वातावरण निर्मिती करून निवडणुकीत मते आपल्याकडे खेचण्यासाठी इंडिया आघाडीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नक्की कोणाचं पारडं जड राहणार, याबाबतची उत्सुकता देशभरात निर्माण झाली आहे. देशातील जनतेचा कल कुणाचा बाजूने आहे, याचा अंदाज यावा यासाठी विविध संस्थांकडून सर्व्हे केले जातात. अशातच एबीपी न्यूज आणि सीव्होटर यांनी काही राज्यांमधील लोकसभा जागांबाबत केलेला ताजा ओपिनियन पोल समोर आला आहे.
या सर्वेक्षणानुसार, आता निवडणुका झाल्या तर राजस्थान, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत भाजपला निर्विवाद यश मिळताना पाहायला मिळेल. तर दुसरीकडे, दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये मात्र इंडिया आघाडी बाजी मारू शकते.
कोणत्या राज्यात कोणाला किती जागा मिळणार?
एबीपी न्यूज-सीव्होटरच्या सर्वेक्षणानुसार, राजस्थानातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच २५ जागांवर भाजपचा विजय होऊ शकतो. हीच स्थिती गुजरातमध्येही पाहायला मिळेल. गुजरातमधील सर्व २६ जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप क्लीन स्विप करण्याची शक्यता या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे, तामिळनाडूत इंडिया आघाडीला ३९ पैकी ३९ जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. सोबतच केरळमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळेल आणि २० पैकी १६ जागांवर हाताला बळकटी मिळेल, असा अंदाज आहे. तर चार जागा या यूडीएफ पक्षाला जातील.
दरम्यान, हरियाणातील १० पैकी आठ जागांवर भाजप तर दोन जागा काँग्रेसच्या खात्यात जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.