विशेष अधिवेशनापूर्वी नव्या संसदेवर फडकणार तिरंगा, PM नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 10:48 AM2023-09-13T10:48:35+5:302023-09-13T10:50:01+5:30
संसदेच्या विशेष अधिवेशनात १९ सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात स्थलांतरित करण्याचा कार्यक्रम होणार आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी नवीन संसद भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. येत्या १७ सप्टेंबरला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नवीन संसदेच्या प्रांगणात तिरंगा ध्वज फडकवतील. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहू शकतात. संसदेच्या विशेष अधिवेशनात १९ सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात स्थलांतरित करण्याचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजा आहे. भगवान विश्वकर्मा यांना सृष्टीचे देवता तसेच जगातील पहिले शिल्पकार, वास्तुविशारद आणि अभियंता मानले जाते. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे. तसेच, मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा केली आहे. याआधी १७ सप्टेंबरला नव्या संसदेवर तिरंगा फडकवला जाईल.
संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते. तसेच, संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत विरोधक आक्रमक आहेत. नुकतेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी कोणतीही चर्चा न करता विशेष अधिवेशन जाहीर करण्यात आल्याचे म्हटले होते.
विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १८ सप्टेंबरला जुन्या संसद भवनातच बैठक होणार आहे. या दिवशी जुन्या संसद भवनाच्या बांधकामापासून आतापर्यंतच्या आठवणींवर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय, नवीन संसदेतसंसद कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कमळाच्या फुलाचे प्रिंट असणारे गुलाबी शर्ट व खाकी पँट तसेच गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागणार आहे. हा नवा ड्रेसकोड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने (एनआयएफटी) तयार केला आहे.