अमित शहांचा राज्यातल्या भाजप नेत्यांना 'शब्द'; फडणवीसांनी दिल्लीत घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 01:39 AM2020-10-06T01:39:32+5:302020-10-06T06:50:37+5:30
राज्यातील भाजप नेत्यांनी घेतली भेट
सोलापूर : राज्यात अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना अर्थसहाय्य आणि ऊसापासून इथेनॉल निर्मिती यासंदर्भात केंद्र सरकार लवकरच नवे धोरण आखणार आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी राज्यातील भाजप नेत्यांना दिले.
राज्यातील साखर उद्योगाच्या विविध मागण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राहुल कुल यांनी सोमवारी नवी दिल्लीत अमित शहा,धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्यांपुढील अडचणींचा गोषवारा मांडला. राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने अडचणीत आहेत.
केंद्र सरकारने विशेष धोरण राबवून त्यांना अर्थसहाय्य केले तरच यंदाच्या हंगामात हे कारखाने सुरू होतील आणि ऊस उत्पादकांच्या अडचणी दूर होतील, असे भाजप आमदारांनी सांगितले. केंद्र सरकार याबद्दल लवकरच धोरण जाहीर करेल. साखर कारखाने वाचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले.
ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासंदर्भातही साखर कारखान्यांना अर्थसहाय्यासोबत विशेष धोरण अपेक्षित आहे. याबद्दल लवकरच निर्णय घेऊ, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.