देशाच्या तिन्ही सेनादलांच्या एकत्रित प्रमुखाचे नवे पद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 06:18 AM2019-12-25T06:18:05+5:302019-12-25T06:18:38+5:30
नवी दिल्ली : लष्कर, हवाई दल आणि नौदल या भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या एकत्रित प्रमुखाचे ‘चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) ...
नवी दिल्ली : लष्कर, हवाई दल आणि नौदल या भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या एकत्रित प्रमुखाचे ‘चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) हे नवे पद तयार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. महिन्याअखेरीस निवृत्त होणारे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची या नव्या पदी नेमणूक केली जाईल, असे सूत्रांकडून समजते.
या नव्या पदाला लष्करातील ‘फोर स्टार’ जनरलचा दर्जा असेल व त्यास सैन्यदलाच्या प्रमुखाएवढा पगार दिला जाईल. सैन्य व्यवस्थापनात आमूलाग्र बदल करण्यासाठी असे पद निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. या मंत्रालयात लष्करी बाबींविषयक नवा स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. ‘चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ’ या विभागाचे पदसिद्ध सचिव असतील.