जवानाचे नव्याने पोस्टमॉर्टेम

By admin | Published: March 5, 2017 01:33 AM2017-03-05T01:33:01+5:302017-03-05T01:33:01+5:30

लष्करी अधिकाऱ्यांचे स्टिंग आॅपरेशन करणाऱ्या नाशिकच्या जवानाच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यामुळे या जवानाच्या मृतदेहावर नव्याने पोस्टमॉर्टेम करण्यात आले.

New postmortem of Javan | जवानाचे नव्याने पोस्टमॉर्टेम

जवानाचे नव्याने पोस्टमॉर्टेम

Next

तिरुवनंतपुरम : लष्करी अधिकाऱ्यांचे स्टिंग आॅपरेशन करणाऱ्या नाशिकच्या जवानाच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यामुळे या जवानाच्या मृतदेहावर नव्याने पोस्टमॉर्टेम करण्यात आले.
नाशिकजवळील देवळाली छावणी भागातील एका दुर्लक्षित लष्करी बराकीत रॉय मॅथ्यू (३३) या जवानाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. केरळातील कोलाम जिल्ह्यातील एळुकोण या गावातील या जवानाचा मृतदेह शनिवारी तिरुवनंतपुरम येथे आणण्यात आला. शहरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्याच्यावर नव्याने पोस्टमॉर्टेम करण्यात आले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
सकाळी त्याचा मृतदेह तिरुवनंतपुरम येथे आणल्यानंतर त्याची पत्नी फिनी व अन्य नातेवाइकांनी त्याची तपासणी केली. त्याच्या पायावर मारल्याच्या खुणा, तसेच काही भागांत रक्त साकळल्याचे दिसून येत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. केरळात पोस्टमॉर्टेम झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी
भूमिका त्यांनी घेतल्यामुळे अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टेमचा निर्णय घेतला.
विमानतळावर आणल्यानंतर मॅथ्यू याचा मृतदेह एका ट्रॉलीवर किमान अर्धा तास पडून होता. कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही वा तो लगेच नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही. त्यामुळे नातेवाईक व गावकरी अतिशय संतापले होते.
जवानाची पत्नी फिनी यांनी कोलामचे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना रीतसर तक्रार देऊन मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे, असे कोलामचे पोलीस अधीक्षक एस. सुरेंद्रन यांनी सांगितले. तक्रारीनंतर पोस्टमॉर्टेमचे आदेश जारी करण्यात आले. विभागीय महसुली अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. विमानतळावर मृतदेहाची प्रतीक्षा करणारी मॅथ्यूची पत्नी फिनी यांनी सांगितले की, मला न्याय हवा आहे. (वृत्तसंस्था)

आॅर्डर्लीला देतात वाटेल ती कामे
मॅथ्यूने लष्कराच्या आॅर्डर्ली सिस्टिममधील जवानांच्या पिळवणुकीचे स्टिंग आॅपरेशन केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आॅर्डर्ली म्हणून काम करणारे जवान चपराशी म्हणून राबत असल्याचे, अधिकाऱ्यांच्या कुत्र्यांना फिरवून आणत असल्याचे, तसेच अधिकाऱ्यांच्या मुलांना शाळेत सोडत असल्याचे या स्टिंगमध्ये दिसून आले होते. याचा व्हिडिओ झळकल्यानंतर मॅथ्यू २५ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता.

Web Title: New postmortem of Javan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.