देशाचे नवे राष्ट्रपती आज ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 06:16 AM2017-07-20T06:16:49+5:302017-07-20T06:16:49+5:30
सोमवारी राष्ट्रपतिपदासाठी संपूर्ण देशांत मतदान झाल्यानंतर गुरुवारी देशभरातील मतांची एकाच ठिकाणी मोजणी करण्यात येणार आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - सोमवारी राष्ट्रपतिपदासाठी संपूर्ण देशांत मतदान झाल्यानंतर गुरुवारी देशभरातील मतांची एकाच ठिकाणी मोजणी करण्यात येणार आहे. एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत आहे. आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास देशाचे 14 वे राष्ट्रपती कोण असतील हे जाहीर होईल.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाल 24 जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी 20 जुलै रोजीच नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे नाव जाहीर होईल. एनडीएकडे तब्बल 63 टक्के मतांचे पाठबळ असल्याने रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर भाजपा नेत्यांनी तसा दावाच केला आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांचे एकूण मूल्य 10,98,882 असून, विजयासाठी 5,49,442 आवश्यक आहे.
देशाच्या संसद भवनात आणि 31 राज्यांच्या विधान भवनांमध्येही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. यावेळी संसद भवनात सोमवारी 99 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
आणखी वाचा ...
रामनाथ कोविंद यांचा विजय का निश्चित मानला जातोय?
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मतदानाच्या 50 टक्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक आहे. एनडीएकडे स्वत:ची 48 टक्के मते आहेत. याखेरीज 6 विरोधी पक्षांसह ज्या 16 पक्षांनी एनडीए उमेदवार कोविंद यांना पाठिंबा दिला, त्यांच्या मतांचे प्रमाण 15 टक्के आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांना किमान 63 टक्के मते निश्चितच मिळू शकतील. कदाचित त्याहून अधिक मतेही ते मिळवू शकतील. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
31 राज्यांच्या विधान भवनांमध्ये मतदान...
- राष्ट्रपती निवडण्यासाठी देशाच्या 31 राज्यांच्या विधान भवनांमध्येही मतदान झाले. मिळालेल्या माहितीनुसार त्रिपुरा, उत्तर प्रदेश व गुजराथमधे क्रॉस व्होटिंग झाले. त्रिपुरात पक्षाचा आदेश झुगारून तृणमूलच्या 6 व काँग्रेसच्या 1 बंडखोराने रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचे समजते.
उत्तर प्रदेशात मुलायमसिंगांचे बंधू शिवपाल यादव यांच्या दाव्यानुसार समाजवादी पक्षातल्या सुमारे 10 आमदारांनी कोविंद यांना मतदान केले, गुजराथमधे भाजपचे बंडखोर आमदार नलिन कोटडिया यांनी मीरा कुमारांना मतदान केल्याचे कळते. राजस्थानात तीन तास आधीच मतदान पूर्ण झाले. महाराष्ट्रात 2 तर झारखंडात 4 आमदारांना तुरुंगातून मतदानासाठी आणले गेले.
खासदारांसाठी हिरव्या तर आमदारांसाठी गुलाबी मतपत्रिका...
- संसद भवनातील केंद्रावर मतदान करणाऱ्यांमधे प्रामुख्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या प्रमुख मायावती आदींचा समावेश होता. खासदार अभिनेता परेश रावल व हेमामालिनी यांनीही संसद भवनात मतदान केले. मतदान केंद्रावर खासदारांसाठी हिरव्या रंगाच्या तर आमदारांसाठी गुलाबी रंगाच्या मतपत्रिका होत्या.