‘ब्रेन पेसमेकर’ ठरला पार्किन्सन्स रुग्णांसाठी आशेचा नवा किरण
By Admin | Published: February 19, 2016 03:15 AM2016-02-19T03:15:59+5:302016-02-19T03:15:59+5:30
तीन मुलांची आई असलेल्या शशीकला शुक्ला यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेने त्यांच्या जीवनाला तर नवी दिशा मिळाली आहेच, पण पार्किन्सन्सने ग्रस्त असलेल्या हजारो
कोलकाता : तीन मुलांची आई असलेल्या शशीकला शुक्ला यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेने त्यांच्या जीवनाला तर नवी दिशा मिळाली आहेच, पण पार्किन्सन्सने ग्रस्त असलेल्या हजारो रुग्णांसाठीदेखील आशेचा नवा किरण डोकावला आहे.
एक महिन्यापूर्वी दुसऱ्यांच्या मदतीशिवाय एक हातही हलवू न शकणाऱ्या ५५ वर्षीय शशीकला आता पार्किन्सन्सने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आशेचा किरण बनल्या आहेत. ‘पुन्हा चार्ज होण्याची क्षमता असलेल्या एका ‘मेंदू पेसमेकर’चे (ब्रेन पेसमेकर) त्यांच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे,’ असा दावा पूर्व भारतातील मज्जातंतू विशेषज्ज्ञ डॉ. अनिर्बन दीप बॅनर्जी यांनी केला.
अन्य परिणाम (साईड इफेक्टस्) कमीत कमी व्हावेत यासाठी हा मेंदू पेसमेकर सर्वश्रेष्ठ मापदंडानुसार तपासण्यात आला आहे. या प्रक्रियेसाठी अंदाजे साडेचौदा लाख रुपये खर्च येतो, असे त्यांनी सांगितले. ‘शशीकला आता आपल्या हातापायांची हालचाल करू शकतात आणि कुणाच्याही आधाराशिवाय आपले नित्यकर्म करू शकतात, त्यांचे जीवन आता बदलले आहे,’ असेही बॅनर्जी म्हणाले. (वृत्तसंस्था)