म्यानमार होतोय सोने तस्करीचा नवा मार्ग
By admin | Published: March 19, 2017 01:50 AM2017-03-19T01:50:14+5:302017-03-19T01:50:14+5:30
दुबई, थायलंड, बांग्लादेश आणि नेपाळपाठोपाठ मुंबईत सोने तस्करीसाठी म्यानमार नवा मार्ग ठरत असल्याचे चित्र कस्टम विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले. गेल्या सात
मुंबई : दुबई, थायलंड, बांग्लादेश आणि नेपाळपाठोपाठ मुंबईत सोने तस्करीसाठी म्यानमार नवा मार्ग ठरत असल्याचे चित्र कस्टम विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले. गेल्या सात महिन्यांत कस्टम विभागाने म्यानमारमधून तस्करी करण्यात आलेले २४६ किलो सोने जप्त केले आहेत.
पहिल्या सात महिन्यांत केलेली ही कारवाई आहे. म्यानमारमधून २४६ तर दुबईतून १५१ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. २०१५ -१६ मध्ये १ हजार ४१७ किलो सोने दुबईतून जप्त करण्यात आले होते, तर २३२ किलो सोन्याची म्यानमारमधून तस्करी करण्यात आली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा झपाट्याने वाढलेला दिसून आला.
म्यानमारच्या मनीपूर सीमेवरून मोठ्या प्रमाणात सोने तस्करीचा मार्ग अवलंबला जात आहे. मुळात या तस्करांच्या नियोजनबद्ध साखळीमुळे तस्करी वाढताना दिसते. यासाठी भूमार्गाचा वापर करत सीमा पार केल्या जातात. या वेळी गुवाहटी, सिलीगुडी मार्गाने येणारे सोने परदेशातच वितळविले जाते. त्यानंतर, मुंबई कोलकाता, चेन्नईमध्ये विमान किंवा रेल्वे मार्गाने त्याची तस्करी केली जाते.
यात मान्यमारचा नवा मार्गाची भर पडली आहे. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या बंडखोरीच्या चळवळीमुळे अवैधरीत्या सोने तस्करीत वाढत होत असल्याचा अंदाज कस्टम विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. म्यानमार-बांग्लादेश सीमेवरून सहजपणे हे सोने कोलकातामध्ये आणले जाते. कोलकातात सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांची मागणी अधिक असल्याने तस्करांचे फावते. त्यानंतर, हेच सोने मुंबईच्या बड्या मार्केटमध्ये येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात पहिल्या दहा महिन्यात तब्बल १.०२५ किलो सोने आर्थिक वर्षात जप्त केले आहे. बाजाराभावानुसार त्याची किंमत ३५० कोटी इतकी आहे. सोने तस्करीत सर्वात जास्त नफा या तस्करांना मिळतो. एका किलो मागे सर्व खर्च वगळल्यास तस्कराला ९० हजार ते १ लाखांपर्यंत रोख रक्कम मिळते.