कोरोना लसीबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार, केंद्राचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 07:05 PM2021-01-25T19:05:08+5:302021-01-25T19:05:45+5:30
Corona vaccine updates: देशात गेल्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने स्वदेशी लसीबाबत अफवा पसरविण्यासंबंधी (Spreading Rumor's About Vaccines) इशारा दिला आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यांना सांगण्यात आले आहे की, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल, जे कोरोना लसीकरणाबद्दल कोणत्याही प्रकारची अफवा पसरवताना आढळून येतील.
केंद्रीय गृहसचिवांनी आपल्या पत्राद्वारे म्हटले आहे की, अफवा आणि खोट्या बातम्या थांबविण्यासाठी अशा लोकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच, वास्तविक तथ्यांच्या आधारे विश्वसनीय माहिती प्रसारित करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. अफवा पसरविणार्या संस्था आणि व्यक्तींविरूद्ध कायदेशीर तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
याचबरोबर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक लिमिटेडद्वारे विकसित आणि निर्मित केलेल्या दोन्ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक असल्याचे देशातील नॅशनल रेग्युलेटरी अॅथोरिटीने म्हटले आहे, असे अजय भल्ला यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशात गेल्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. लसीकरणानंतर सोशल मीडियावर काही लोकांच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा समोर आल्या आहेत. मात्र, हे मृत्यू लसीशी संबंधित असल्याचे आढळले नाही. या अफवांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस देऊ नका आणि ही लस हा धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला आवाहन
भारतीय वैज्ञानिकांनी कोरोनाची लस विकसित करून आपले कर्तव्य पार पाडले आहे आणि आता खोट्या बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्या प्रत्येक नेटवर्कला योग्य माहितीच्या सहाय्याने पराभूत करून आपले कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्यासाठी जाणाऱ्या एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक आणि कलाकारांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, अशा प्रकारच्या संघटनांनी नेहमीच आव्हानात्मक काळाचा सामना करण्यासाठी आपली भूमिका बजावली आहे.