आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नवी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:06 AM2018-03-16T05:06:15+5:302018-03-16T05:06:15+5:30
शालेय शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने अध्ययन फलनिष्पत्ती (लर्निंग आऊटकम) योजना तयार केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच विषयासंदर्भातील आकलन क्षमता विकसित करण्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे.
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : शालेय शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने अध्ययन फलनिष्पत्ती (लर्निंग आऊटकम) योजना तयार केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच विषयासंदर्भातील आकलन क्षमता विकसित करण्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर केंद्र सरकारने राष्टÑीय फलनिष्पत्ती सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आले आहेत. त्यानुसार तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थ्यांना धड वाचता येत नव्हते. तसेच ४७ टक्के विद्यार्थ्यांना भागाकारही करता आला नाही.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मागच्या सरकारच्या ‘पुढच्या वर्गात बढती’ धोरणामुळे शालेय शिक्षणाचे मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळायचा; परंतु विषयच त्यांना समजत नसे. त्यामुळे सरकारने मागच्या वर्षी सर्व राज्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार २३ राज्यांनी ढकलपास योजना रद्द करण्याचे मान्य केले. त्यानंतर सरकारने या कायद्यात दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना तिसरी, पाचवी आणि आठव्या वर्गात ठेवण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले.
विद्यार्थ्यांना जे काही शिकविले जाते, त्याचे त्यांना आकलन झाले पाहिजे, यादृष्टीने शिकविण्याच्या पद्धतीचे प्रारूप कसे असावे. या सर्व पैलूंवर राष्टÑीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तीन वर्षे संशोधन करून लर्निंग आऊटकम योजनेचे प्रारूप निश्चित केले.
एनसीईआरटीच्या क्रमिक अभ्यासक्रमानुसार शाळेत शिकविले जाते होते; परंतु अभ्यास कसा करावे, हे सांगितले जात नव्हते. लर्निंग आऊटकममध्ये शिक्षकांसाठी काही सोप्या पद्धती सुचविण्यात आल्या आहेत.
काय आहे योजना?
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासंदर्भात आवड निर्माण करणे, यासाठी शिकवण्याची पद्धत सोपी करून प्रत्येक विषय समजावून सांगितला जाईल. हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्रासह सर्व विषयांचा समावेश आहे. प्रत्येक वर्गासाठी केवळ एक पानाचा लर्निंग आऊटकम असेल.
पुस्तके पाहूनच विद्यार्थ्यांत अभ्यासाची आवड निर्माण होते. त्यासाठी वर्णमालेबाबत माहिती देण्यासोबत कविता शिकविताना कशा प्रकारे अक्षर ओळख करावी, याचा यात उल्लेख करण्यात आला आहे.
चिन्हे, संकेत, मानचित्रात दिशांची ओळख, चंद्र, सूर्य, तारे तसेच चॉकलेट, टेबल यासारख्या वस्तूंचे चित्र आणि आकारमान याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे नमूद करण्यात आले आहे. प्लास्टिक चलनातून आर्थिक व्यवहार कसा करावा, हे समजावून सांगण्यात येणार आहे.