देशात आता नवा नारा; अरहर मोदी
By admin | Published: July 29, 2016 03:06 AM2016-07-29T03:06:52+5:302016-07-29T03:06:52+5:30
दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी देशाला विनंती केली होती की मला देशाचे पंतप्रधान न करता पहारेकरी (चौकीदार) बनवा. आज त्याच चौकीदाराच्या नाकाखाली टिच्चून डाळीची चोरी होत आहे.
नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी देशाला विनंती केली होती की मला देशाचे पंतप्रधान न करता पहारेकरी (चौकीदार) बनवा. आज त्याच चौकीदाराच्या नाकाखाली टिच्चून डाळीची चोरी होत आहे. आज संपूर्ण देशात लोक घोषणा देत आहेत ‘अरहर मोदी, अरहर मोदी’ अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत गुरुवारी जोरदार हल्ला केला.
राहुल गांधी यांनी देशात चलनवाढीच्या मुद्द्यावर विस्ताराने भाष्य केले. पंतप्रधान जीवनावश्यक वस्तूंच्या भडकत्या किमती सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर बोलतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने आपला दुसरा वर्धापनदिन जोरात साजरा केला; परंतु या दोन वर्षांत आपण दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही याचा त्यांना विसर पडला. सरकारच्या दुसऱ्या वाढदिवस कार्यक्रमात मोदी ‘मेक इन इंडिया’, ‘कनेक्ट इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’बद्दल बोलले; परंतु ते वाढत्या किमतींबद्दल काही म्हणाले नाहीत. ते एकदाही डाळी, बटाटे किंवा टमाटे यावर बोलले नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधानांना आश्वासनांचा विसर पडला!
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती हा लोकांसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासंदर्भात खोटी आश्वासने देऊन उपयोग नाही. तुम्ही स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडियावर खोटी आश्वासने देऊ शकाल; परंतु वाढत्या किमतीवर नाही, असेही ते म्हणाले. खोट्या आश्वासनांबद्दल मोदींवर हल्ला करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदींनी प्रत्येकाला दिलेल्या आश्वासनाची व त्याचा त्यांना विसर पडल्याची आठवण मी त्यांना करून देऊ इच्छितो.
चलनवाढ खाली येईल : जेटली
राहुल गांधींनी केलेला आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत फेटाळून लावला व चलनवाढ नियंत्रणात असून ती आणखी खाली येईल, असे सांगितले. फेब्रुवारी २०१४मधील यूपीए सरकारवर चलनवाढीसाठी टीका करून जेटली म्हणाले की, ‘‘हा प्रश्न घोषणांचा नसून आकडेवारी लक्षात घ्यायचा आहे. यूपीए सरकारने अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण केली होती व ती आमच्याकडे आली. निवडणूक लढविणारा कोणताही उमेदवार हा आम्ही सत्तेवर आलो तर चलनवाढ खाली आणू असे म्हणत असतो हे अतिशय स्वाभाविक आहे. याबद्दल कोणालाही काही आक्षेप असू नये.’’
मोदी सरकारने चलनवाढ कमी केली असून ती नियंत्रणात ठेवली आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे चलनवाढ आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. डाळींच्या वाढत्या किमती काळजी कराव्यात अशा आहेत. तो प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली जात आहेत, असेही ते म्हणाले.