'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पोहोचण्यासाठी पश्चिम रेल्वे बनवणार नवं स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 09:26 AM2018-12-13T09:26:51+5:302018-12-13T09:32:47+5:30
नर्मदा नदीकाठच्या सरदार सरोवरामध्ये उभारण्यात आलेली देशातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे.
गुजरातः नर्मदा नदीकाठच्या सरदार सरोवरामध्ये उभारण्यात आलेली देशातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पर्यटकांना रेल्वेच्या माध्यमातून पोहोचता यावं, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन नव्या स्टेशनचं निर्माण करणार आहे. जिथे सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य प्रतिमा विराजमान आहे. तिकडे पर्यटकांना पोहोचण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावर केवडिया या स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. हे रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी ही माहिती दिली आहे. येत्या 15 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन करणार आहेत. यादरम्यान रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित राहणार आहेत. केवडिया रेल्वे स्टेशन निर्माणासाठी जवळपास 20 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे. या रेल्वे स्टेशनचं काम सप्टेंबर 2019पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वे डभोई आणि चांदोद स्टेशनांदरम्यानच्या 18 किलोमीटर लाइनचा विस्तार करत आहे. त्यानंतर त्याची पुढील लाइन 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या केवडियापर्यंत वाढवण्यात येणार आहे.
केवडिया स्टेशनची इमारत तीन मजली असणार आहे. पहिल्या दोन मजल्यांवर रेल्वे संबंधित सुविधा पुरवण्यात येणार आहे. तर तिसऱ्या मजल्यावर एक आर्ट गॅलरी बनवण्यात येणार आहे. या गॅलरीमध्ये स्थानिक आदिवासी जाती यांची कला आणि शिल्पकला प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.