खूशखबर! जुन्या फ्रीज,वॉशिंग मशीनवर सरकार देणार इन्सेंटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:48 AM2019-10-18T11:48:48+5:302019-10-18T11:50:51+5:30
गाडी, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीनसारख्या अन्य वस्तू जुन्या झाल्यावर सर्वच ते भंगारात विकतात. मात्र आता एक खूशखबर आहे.
नवी दिल्ली - सणांच्या निमित्ताने अनेक नवीन वस्तूंची प्रामुख्याने खरेदी केली जाते. तसेच एखादी वस्तू जुनी झाली की ती विकून नवीन वस्तू घेतली जातात. गाडी, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीनसारख्या अन्य वस्तू जुन्या झाल्यावर सर्वच ते भंगारात विकतात. मात्र आता एक खूशखबर आहे. कारण सरकार लवकरच या जुन्या वस्तूंवर इन्सेंटिव्ह देणार आहे. यासाठी पुढील आठवड्यात सरकार स्टील स्क्रॅपेज पॉलिसी आणण्याच्या तयारीत आहे. या धोरणाचा मसुदा तयार झाला असून त्याला अंतिम रुप देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
स्टील स्क्रॅप पॉलिसीमध्ये याआधी फक्त गाड्यांचा समावेश होता. मात्र आता एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशीनचा देखील समावेश करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टील स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत अनेक ठिकाणी स्क्रॅप सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. या सेंटरमध्ये स्क्रॅप विकता येणार असून यामध्ये सर्वच प्रकारातील जुन्या स्टीलचा समावेश असणार आहे. स्टील तुम्ही स्क्रॅप सेंटरमध्ये विकल्यास सरकार इन्सेंटिव्ह देणार आहे.
स्क्रॅप सेंटरमध्ये भंगारात काढलेल्या वस्तूच्या किंमतीशिवाय सरकारकडून इन्सेंटिव्ह म्हणून अधिकची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक हे वस्तू विकण्यासाठी सेंटरमध्ये येतील अशी आशा आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्सेंटिव्ह म्हणून किती रक्कम द्यायची यावर सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच यावरील चर्चा पूर्ण झाल्यावर स्टील स्क्रॅपेज पॉलिसी जाहीर करण्यात येईल. तसेच यावर लोकांचे आणि तज्ञांचे मत विचारात घेण्यात येणार आहे. त्यानंतर ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे.
स्टीलच्या सर्व जुन्या वस्तू, स्क्रॅपेज एका ठिकाणी जमा करण्यासाठी या पॉलिसीचा खूप फायदा होणार आहे. तसेच त्याचा पुनर्वापर करता येणार आहे. जुन्या गाड्या विकून नवीन गाड्यांची खरेदी लोकांना करता येईल. त्यामुळे नव्या वाहनांच्या विक्रीत वाढ होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच स्टील आयात करणे कमी होईल. भारतात दरवर्षी जवळपास 60 लाख टन स्टील स्क्रॅप आयात करण्यात येते. सरकारच्या स्टील स्क्रॅपेज पॉलिसीचा लोकांन फायदा होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.