"कोरोनाच्या नव्या लक्षणांमुळे मेंदूचा सखोल अभ्यास व्हावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:42 AM2021-08-10T06:42:09+5:302021-08-10T06:42:26+5:30

डॉ. योगिता अडलखा यांनी विकसित केले मानव आधारित मॉडेल

New symptoms of corona should be studied in depth in the brain | "कोरोनाच्या नव्या लक्षणांमुळे मेंदूचा सखोल अभ्यास व्हावा"

"कोरोनाच्या नव्या लक्षणांमुळे मेंदूचा सखोल अभ्यास व्हावा"

Next

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या घातक परिणामांशी जग लढत असताना सार्स कोव्ह-२ ने कोरोनानंतर आरोग्याच्या अनेक गुंतागुंती निर्माण केल्या, त्यात विस्मरणाचे (अल्झायमर) प्रमाण वाढण्यासारख्या आकलनविषयक दोषांचा समावेश आहे. या नव्या लक्षणांमुळे मेंदूचा अभ्यास क्षेत्रात सखोल संशोधनाची गरज निर्माण झाली आहे.

डॉ. योगिता अडलखा या भारतीय संशोधकाने मेंदूतील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी मानव-आधारित नमुना विकसित केला आहे. या नमुन्यामुळे मज्जातंतूंतील बिघाडांचा अधिक चांगला अभ्यास करता येऊ शकेल. मानव-आधारित हे मॉडेल अशाप्रकारचे पहिलेच असून, ते आत्मकेंद्रीपणासारख्या (ऑटिझम) मेंदूतील बिघाडांवर उपचारांची रचना करण्यास मदत करू शकते.

डॉ. योगिता अडलखा या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थशी संबंधित असून त्यांनी मानवी वैशिष्ट्ये असलेल्या मेंदूच्या पेशी या थेट रुग्णाच्या रक्तातून निर्माण करण्यात यश मिळवले आहे. “प्रत्यक्षात मानवी मेंदूची पुनरावृत्ती करू शकेल अशा मॉडेल्सचा विकास होणे ही काळाची गरज आहे”, असे डॉ. योगिता अडलखा म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, “घडवून आणलेल्या प्लुरिपोटेंट स्टेम सेल्सचे रूपांतर टिश्यू कल्चर डिशमध्ये मज्जातंतू स्टेम पेशींत करण्यात आले. या पेशी मज्जातंतू स्टेम पेशीसारखे वर्तन करतात”.

आतापर्यंतचा मज्जातंतू विज्ञानविषयक (न्यूरोलॉजिकल) अभ्यास आणि मेंदू कसे काम करतो, याची आम्हाला असलेली समज ही एक तर मेंदूच्या नमुन्यांची किंवा जनावरांच्या मॉडेल्सची केलेली चिकित्सा याच्या आधारावरील आहे. या मॉडेल्सनी गुंतागुंतीच्या मज्जातंतू हालचाली समजून घेण्याची समज वाढवण्यात मदत केली असली तरी हे मॉडेल्स औषध विकसित करण्यात यशस्वी ठरले नाहीत. 

स्टेम सेल टेक्नॉलॉजी
जनावरांच्या मॉडेल्सवर ज्या औषधांच्या चाचण्या यशस्वी ठरल्या, त्या वैद्यकीय चाचण्यांत अयशस्वी ठरल्या. त्यामुळे प्रत्यक्षात मानवी मेंदू, त्याची कार्ये आणि आजार यांची नक्कल करू शकेल, अशी मॉडेल्स विकसित होणे ही नेहमीची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे आणि याचे उत्तर आहे स्टेम सेल टेक्नॉलॉजी, असे डॉ. अडलखा म्हणाल्या.

Web Title: New symptoms of corona should be studied in depth in the brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.