कंपनी सोडताय?, मग थांबा; ... तर तुम्हाला भरावा लागेल १८ टक्के GST
By जयदीप दाभोळकर | Published: January 14, 2021 12:19 PM2021-01-14T12:19:03+5:302021-01-14T12:22:37+5:30
एका प्रकरणादरम्यान गुजरात अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगचा मोठा निर्णय
जर एखाद्या कंपनीत तुम्ही काम करत आहात आणि तुम्ही दुसऱ्या कंपनीत जाण्याच्या विचारात आहात तर जाण्यापूर्वी हे नक्कीच वाचा. जर कंपनीनं ठरवून दिलेल्या निर्धारित नोटीस पिरिअडशिवाय तुम्ही नोकरी सोडण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला हे महाग पडू शकतं. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी सोडण्यापूर्वी आपल्या कंपनीत नोटीस परिअड पूर्ण केला नाही तर त्याला आता १८ टक्के वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी भरावा लागू शकतो. गुजरात अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगनं यासंबंघी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालात त्यांनी नोटीस पिरिअड पूर्ण केल्याशिवाय नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रिकव्हरी म्हणून १८ टक्के जीएसटी वसूल करण्यास सांगितलं आहे.
गुजरातमधील प्रकरण
अहमदाबादमधील एक निर्यात कंपनी एम्नेल फार्मास्युटिकल्समध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं तीन महिन्यांचा नोटीस पिरिअड न देता आपलं काम सोडण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणातील सुनावणी ऑथोरिटीसमोर करण्यात आली. ही कंपनी आपल्या अनेक उत्पादनांची निर्यात करते. नोटीस पिरिअडबाबत अनेक कंपन्यांचे निरनिराळे नियम असतात. अनेक ठिकाणी १ महिन्यांपासून तीन महिन्यांपर्यंतचा नोटीस पिरिअड पूर्ण करावा लागतो. एम्नेल फार्मास्युटिकल्समध्ये तीन महिन्यांचा नोटीस पिरिअड आहे.
अथॉरिटी म्हणालं...
"एन्ट्री ऑफ सर्व्हिसेसअंतर्गत सदर कर्मचाऱ्याला १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे," असं अथॉरिटीनं आपल्या निर्णयात सांगितलं. हा जीएसटी नोटीसच्या कालावधीत दिल्या जाणाऱ्या पैशांच्या रिकव्हरीवर लागू होणार आहे. कर्मचारी आणि कंपनीच्या दरम्यान जो करार होणार आहे त्याचा उल्लेख नोटीस पिरिअडमध्ये करण्यात आला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना ही रक्कम द्यावी लागणार आहे. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याला नोटीसच्या कालावधीच्या उल्लंघनाच्या बदल्यात ही रक्कम द्यावी लागणार आहे.