बिहार, प. बंगालच्या काही जिल्ह्यांचा नवा केंद्रशासित प्रदेश? घुसखोरांच्या समस्येवर तोडगा काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 06:15 AM2022-10-13T06:15:29+5:302022-10-13T06:15:47+5:30
अलीकडच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार आणि बंगालमधील किशनगंजचा दौरा केला. यावेळी त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला, तेव्हा ते बांगलादेशी घुसखोरांबद्दल बोलत होते.
- विभाष झा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : देशातील केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत लवकरच एक नवीन नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. बिहार आणि प. बंगालमधील सीमेला लागून असलेले अर्धा डझन जिल्हे जोडून नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती होईल, असे बिहार सीमावर्ती भागाचे तज्ज्ञ सांगतात.
अलीकडच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार आणि बंगालमधील किशनगंजचा दौरा केला. यावेळी त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला, तेव्हा ते बांगलादेशी घुसखोरांबद्दल बोलत होते. नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, बिहारचे किशनगंज, अररिया, कटिहार तसेच प. बंगालचे पूर्णिया, न्यू जलपाईगुडीसह अनेक भाग जोडून केंद्रशासित प्रदेश बनविण्याच्या हालचाली आहेत.
बिहारचे ४० विधानसभा मतदारसंघ व प. बंगालचे ८० विधानसभा मतदारसंघ या नवीन केंद्रशासित प्रदेशात समाविष्ट होऊ शकतात. असे झाल्यास देशातील ९वा केंद्रशासित प्रदेश ठरेल. राष्ट्रपतींद्वारे प्रशासकांची नियुक्ती होईल.
तयारीला वेग, अहवाल सुपूर्द
n नवीन केंद्रशासित प्रदेश निर्मितीची शक्यता लक्षात घेता तयारीला वेग आला आहे. यासंदर्भातील अहवाल शासनाकडे सुपुर्द करण्यात येत आहेत.
n भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नसलेल्या किंवा अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशींना शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बिहार आणि प. बंगालच्या सीमावर्ती जिल्ह्यांत अल्पसंख्याकांची लोकसंख्या मोठी आहे.
n त्यात बांगलादेशी घुसखोरांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. वोट बँकेच्या राजकारणातून अशा अनेक घुसखोरांना येथे स्थिरस्थावर करण्यात आल्याचा दावाही ते करतात.