Corona Virus :कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; लस घेतलेल्यांनाही धोका?, जाणून घ्या, किती खतरनाक?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:48 PM2023-08-21T12:48:33+5:302023-08-21T12:56:00+5:30
Corona Virus : जगासमोर नवीन आव्हानं येत आहेत. पुन्हा एकदा नवीन व्हेरिएंटने जगातील चार देशांमध्ये एन्ट्री केला आहे.
कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्याचे नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. जगासमोर नवीन आव्हानं येत आहेत. पुन्हा एकदा नवीन व्हेरिएंटने जगातील चार देशांमध्ये एन्ट्री केला आहे. असं मानलं जातं की हा व्हेरिएंट अतिशय धोकादायक आहे. या नवीन व्हेरिएंटचे नाव BA.2.86 आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट BA.2.86 पैकी प्रत्येकी एक प्रकरण नोंदवलं गेलं आहे. त्याच वेळी, डेन्मार्कमध्ये या व्हेरिएंटची लागण झालेले तीन रुग्ण आढळले आहेत.
BA.2.86 ने 36 म्युटेशन दाखवले आहेत, जे ते सध्याच्या प्रभावी कोरोना व्हेरिएंट XBB.1.5 पेक्षा वेगळे करतात. कोरोनाचे हे नवीन व्हेरिएंट वेगाने पसरतात आणि लोकांना गंभीरपणे आजारी बनवतात याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. परंतु नवीन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता, वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी लोकांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.
नवीन व्हेरिएंटवर लक्ष
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक डॉ. टेड्रोस एधानोम घेब्रेयसस यांनी कोविड-19 ही सध्या जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही, परंतु ती अजूनही धोकादायक परिस्थिती आहे. अलीकडेच, कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट समोर आला आहे, ज्याचे स्वरूप अनेक वेळा बदललं आहे, BA.2.86 चे स्वरूप सध्या तपासले जात आहे, जे पुन्हा एकदा दर्शवते की सर्व देशांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर BA.2.86 व्हेरिएंटने धोकादायक स्वरूप धारण केलं, तर सध्याची लस नवीन व्हेरिएंटसाठी तितकी प्रभावी सिद्ध होणार नाही. ह्यूस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलच्या डायग्नोस्टिक मायक्रोबायोलॉजी विभागाचे संचालक डॉ. एस. वेसले लाँग यांच्या मते, हा व्हेरिएंट कोरोनाच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटमधून आला आहे. म्हणूनच तो व्हेरिएंट हा या व्हेरिएंटपासून वेगळा आहे ज्याच्याशी लढण्यासाठी कोरोना लस बनवण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.