Omicron New Variant: चिंताजनक! आरटीपीसीआरला चकवा, ओमायक्रॉनचा नवा व्हेरिअंट घशातच राहत नाही, फुफ्फुसावरही हल्ला करतो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:34 AM2022-01-25T08:34:39+5:302022-01-25T09:18:30+5:30
Omicron New Variant in India: इंदौरमध्ये या व्हेरिअंटचे १२ रुग्ण सापडले असून यामध्ये ६ मुलेदेखील आहेत. BA.2 स्ट्रेन मूळ ओमायक्रॉनपेक्षाही वेगाने पसरत आहे.
ओमायक्रॉन कोरोना व्हायरसचा नवा प्रकार जन्माला आला असून त्याने भारतासह जगभराच्या चिंता वाढविण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉनचा मूळ व्हेरिअंट BA.1 आणि नुकताच सापडलेला नवा व्हेरिअंट BA.2 हे दोन्ही वेगवेगळे आहेत. भारतात या नव्या व्हेरिअंटचे ५०० हून अधिक रुग्ण सापडले असून इंदौरमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे.
इंदौरमध्ये या व्हेरिअंटचे १२ रुग्ण सापडले असून यामध्ये ६ मुलेदेखील आहेत. BA.2 स्ट्रेन मूळ ओमायक्रॉनपेक्षाही वेगाने पसरत आहे. त्याचबरोबर हा स्ट्रेन रुग्णांच्या फुफ्फुसावर देखील सर्वाधित परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ओमायक्रॉनचा मूळ स्ट्रेन BA.1 ही घशापर्यंतच जाऊन राहत होता. मात्र, नवा व्हेरिअंट डेल्टासारखाच फुफ्फुसावर हल्ला करत असल्याने चिंता वाढू लागली आहे. रुग्णांच्या फुफ्फुसामध्ये ५ ते ४० टक्क्यांपर्यंत इन्फेक्शन झाल्याचे दिसले आहे.
ओमायक्रॉन आणि या व्हेरिअंटमध्ये हाच एक मोठा फरक आहे. BA.2 सब स्ट्रेनला स्टील्थ म्हणजे लपलेले व्हर्जन असे म्हटले जात आहे. हा स्ट्रेन आतापर्यंत ४० हून अधिक देशांमध्ये साप़डला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनने या स्ट्रेनची माहिती दिली होती. तसेच हा स्ट्रेन भारतातही सापडल्याचे म्हटले होते.
१७ वर्षांचा मुलगा गंभीर
अरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या १७ वर्षांच्या रुग्णाच्या फुफ्फुसांवर ४० टक्के संक्रमण झाले आहे. तर दोन रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर चार रुग्णांमध्ये ओमायक्रॉन BA.1 असल्याचे समोर आले आहे.
आरटीपीसीआरला चकमा
BA.2 सब स्ट्रेनने आणखी एक वाढविलेली चिंता म्हणजे, तो आरटीपीसीआर चाचणीला देखील चकमा देऊ शकतो. स्टील्थ ओमायक्रॉनने युरोपमध्ये आणखी वेगवान लाटेची शक्यता निर्माण केली आहे.