नववर्षात वाहने महागणार

By admin | Published: December 30, 2014 11:36 PM2014-12-30T23:36:13+5:302014-12-30T23:36:13+5:30

नवीन वर्षात स्वयंचलित वाहने आणि टिव्ही, फ्रीज यासारख्या ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. या उत्पादनांना देण्यात आलेला सवलतीतील अबकारी कर १ जानेवारीपासून दिला जाणार नाही.

New vehicles will cost dearly | नववर्षात वाहने महागणार

नववर्षात वाहने महागणार

Next

नवी दिल्ली : नवीन वर्षात स्वयंचलित वाहने आणि टिव्ही, फ्रीज यासारख्या ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. या उत्पादनांना देण्यात आलेला सवलतीतील अबकारी कर १ जानेवारीपासून दिला जाणार नाही.
स्वयंचलित वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादन क्षेत्राला यापुढे सरकार अबकारी करात सवलत देणार नाही, असे अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. या निर्णयामुळे सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या राहिलेल्या तीन महिन्यांत अतिरिक्त महसूल मिळेल. सध्या सरकारपुढे आर्थिक तूट सकल देशी उत्पादनाच्या ४.१ टक्के करण्याचे लक्ष्य असून त्या दिशेने हा निर्णय मदत करू शकेल.
आर्थिक वाढीचा वेग मंदावल्यामुळे अडचणींत आलेल्या या दोन क्षेत्रांना यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ही सवलत यावर्षी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात दिली होती. ही सवलत कार्स, एसयूव्ही, दुचाकी वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनांना मिळत होती.
यावर्षी जून महिन्यात नरेंद्र मोदी सरकारने अबकारी करातील ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली होती. सरकारच्या या निर्णयाची औपचारिक माहिती कंपन्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आम्हाला उत्पादनांच्या किमती किती वाढवायच्या याचा निर्णय घेता आलेला नाही, असे होंडा कार्स इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग अँड सेल्स) ज्ञानेश्वर सेन यांनी सांगितले. सेन म्हणाले, ‘‘या निर्णयामुळे किमती वाढतील यात शंका नाही व या निर्णयामुळे काही कालावधीसाठी मागणीवरही परिणाम होईल.’’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त करताना मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव म्हणाले,‘‘ हा सरकारचा निर्णय असून तो स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्याचा विक्रीवर परिणाम होईल व काही काळासाठी का होईना विक्री घटेल.’’
२०१५ च्या पहिल्या तीन महिन्यांत चांगली विक्री होईल, अशी आमची अपेक्षा होती; परंतु सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांचा हिरमोड होईल, असे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे एरिक ब्रॅगन्झा म्हणाले. ब्रॅगन्झा हे हायर इंडियाचे अध्यक्षही आहेत. सलग दोन वर्षे मंदी अनुभवलेल्या वाहन बाजारपेठेला यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान १०.०१ टक्के मिळाली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

४छोट्या कार्स, स्कूटर्स, मोटारसायकल्स आणि व्यावसायिक वाहनांना अबकारी कर १२ टक्क्यांऐवजी ८ टक्के दिला गेला होता. एसयूव्हीसाठी हा कर ३० टक्क्यांवरून २४ टक्के करण्यात आला होता. मध्यम आकाराच्या कार्सना २४ वरून २० आणि मोठ्या कार्सना २७ वरून २४ टक्के कर सवलत दिली गेली होती. ग्राहकोपयोगी उत्पादनांना १२ टक्क्यांवरून १० टक्के अबकारी कर लावण्यात आला होता.

सरकारच्या निर्णयामुळे येणारे ओझे ग्राहकांवर ढकलण्याची वेळ आली आहे व विक्रीवरही परिणाम होईल, असे ग्राहकोपयोगी उत्पादकांनी म्हटले.
अबकारी करात वाढ झाल्यामुळे उद्योजकांना किमती वाढविण्याशिवाय पर्याय नसेल, असे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे एरिक ब्रॅगन्झा यांनी सांगितले.

Web Title: New vehicles will cost dearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.