Vaishno Devi: नववर्षात वैष्णोदेवीला जाण्याचा विचार करताय? आता 'या' कार्ड शिवाय दर्शन मिळणार नाही! जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:25 PM2022-12-30T17:25:51+5:302022-12-30T17:31:10+5:30
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जम्मूच्या कटरा येथे माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची गर्दी होते.
कटरा-
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जम्मूच्या कटरा येथे माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची गर्दी होते. यासाठी श्री माता वैष्णोदेवी बोर्ड, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी व्यापक पातळीवर सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतली आहे. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी यात्रा मार्गावर ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. प्रत्येक भाविकाला रेडियो फ्रिक्वेन्सी ओळख पत्र (RFID) देण्यात येणार आहे. या कार्डविना कोणत्याही भाविकाला दर्शन घेता येणार नाही.
१ जानेवारी २०२२ रोजी वैष्णोदेवी दर्शनावेळी चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. त्यामुळे अशी घटना पु्न्हा घडू नये यासाठी प्रशासनाकडून खास व्यवस्था केली गेली आहे.
कोरोना नियमांचं होणार पालन
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. लाउडस्पीकरच्या माध्यमातून लोकांना मास्क घालण्याच्या सूचना देण्यात येत आहे. पण अद्याप मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलेलं नाही.
नुकतंच जम्मूच्या सीमेवरील सिधरामध्ये झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीनंतर कटरा येथील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ऑपरेशन कमांड वाहन ब्लॅक पँथरची मदत घेतली जात आहे. या वाहनाचा वापर दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत केला जातो. या वाहनात सीसीटीव्ही, पीटीझेड कॅमेरा, ३६० डीग्री व्ह्यू कॅमेरा, पब्लिक मदत सिस्टम, मॉनिटर आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असतात.