नव्या वर्षात कर्मचाऱ्याला प्रॉव्हिडंट फंडातील अधिक पैसे शेअर्समध्ये गुंतविता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 02:40 AM2019-01-01T02:40:58+5:302019-01-01T02:41:45+5:30
भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक वाढविण्याचा पर्याय नव्या वर्षात देण्याची शक्यता आहे. आणखी काही सामाजिक सुरक्षा लाभ व निधीच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल आयुधांची भेटही ईपीएफओकडून मिळू शकते.
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक वाढविण्याचा पर्याय नव्या वर्षात देण्याची शक्यता आहे. आणखी काही सामाजिक सुरक्षा लाभ व निधीच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल आयुधांची भेटही ईपीएफओकडून मिळू शकते.
सध्या ईपीएफओ १५ टक्के रक्कम एक्सचेंज ट्रेडेड फंडात (ईटीएफ) गुंतविते. या फंडात आतापर्यंत ५५ हजार कोटींची गुंतवणूक झाली. ईटीएफमधील गुंतवणूक ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात दिसत नाही. आपल्या हिश्श्यातून अधिकची रक्कम शेअर बाजारात गुंतविण्याचा पर्यायही सदस्यांसाठी उपलब्ध नाही. ईपीएफओ आता नवे सॉफ्टवेअर विकसित करीत आहे. प्रत्येक ईपीओ सदस्यांची रोख व ईटीएफमधील गुंतवणूक हे सॉफ्टवेअर स्वतंत्रपणे दाखवील. सध्या एकूण रक्कम रोख स्वरुपात खात्यावर दिसते. या सॉफ्टवेअरमुळे ईटीएफमधील गुंतवणूक वाढविण्याचा वा कमी करण्याचा पर्याय सदस्यांना असेल, असे ईपीएफओच्या सूत्रांनी सांगितले.
२० कोटी कामगारांची खाती
२०१८ मध्ये ईपीएफओने पेन्शनर्स पोर्टल सुरू केले. पेन्शनविषयीची सर्व माहिती त्यावर मिळते. ईपीएफओ सध्या १९० क्षेत्रातील उद्योगांना सेवा देते. ११.३ संस्थांमधील २० कोटी कामगार-कर्मचाºयांची खाती ईपीएफओकडे आहेत.