नवं वर्ष, नवं मिशन; ब्रह्मांडातील बारकावे शोधणाऱ्या इस्रोच्या XPoSAT सॅटेलाईटची झेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 11:35 PM2023-12-31T23:35:30+5:302023-12-31T23:49:39+5:30
या सॅटेलाईटसाठी लागलेल्या टेलिस्कोपला रमन रिसर्च इंस्टीट्यूटने बनवले आहे.
श्रीहरीकोटा - नवीन वर्षाच्या दिनी नवा संकल्प करुन नवं ध्येय आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकलं जातं. इस्रोनेही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशासाठी मोठं स्वप्न पाहिलं असून १ जानेवारी रोजी या स्वप्नाचं पहिलं पाऊल पडणार आहे. १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता इस्रोकडून इतिहास रचला जाईल. श्रीहरी कोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर येथून XPoSAT सॅटेलाईटचे लाँचिंग केले जाणार आहे. आंतराळात होणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास हे सॅटेलाईट करेल. तसेच, त्याच्या स्त्रोतांचे छायाचित्रही काढेल.
या सॅटेलाईटसाठी लागलेल्या टेलिस्कोपला रमन रिसर्च इंस्टीट्यूटने बनवले आहे. ब्रह्मांडातील ५० सर्वाधिक चमकणाऱ्या स्त्रोतांचा अभ्यास या सॅटेलाईटद्वारे करण्यात येईल. पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बाइनरी, अॅक्टीव्ह गॅलेक्टीक न्यूक्लियाई, नॉन-थर्मल सुपरनोवा इत्यादी. या सॅटेलाइटला ६५० किमी ऊंचीवर तैनात केलं जाईल.
इस्रोने या मिशनची सुरुवात सन २०१७ मध्येच केली होती. या मिशनसाठी ९.५ कोटी रुपये एवढा खर्च आला आहे. लाँचिंगच्या जवळपास २२ मिनिटांनंतर एक्सपोसॅट सॅटेलाईट आपल्या निर्धारित कक्षेत तैनात होईल. या सॅटेलाईट्सला दोन पेलोड्स आहेत. पहिला-पोलीक्स आणि दुसरा एक्सपेक्ट
पोलीक्स
पोलीक्स हा या सॅटेलाईटचा मुख्य पेलोड आहे. रमन रिसर्च इंस्टीट्यूट आणि युआर राव सॅटेलाईट सेंटरने एकत्र येऊन हे बनवले आहे. १२६ किमीचं हे यंत्र अंतराळात स्त्रोतांचे चुंबकीय फील्ड, रेडिएशन, इलेक्ट्रॉन्स इत्यादीचा अभ्यास करेल. हे ८-३० kev रेंजच्या एनर्जी बँडचा अभ्यास करेल. पोलीक्स अंतराळातील ४० ते ५० सर्वात चमकदार ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करेल.
एक्सपेक्ट
एक्सपेक्ट म्हणजे X-ray स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंग. हा 0.8-15 keV रेंजच्या एनर्जी बँडचा अभ्यास करणार. तसेच, पल्सर, ब्लॅक होल बायनरी, लो-मॅग्नेटिक फील्ड न्यूट्रॉन स्टार, मॅग्नेटार्स इत्यादींचाही अभ्यास करेल.
PSLV रॉकेटचे ६० वे उड्डाण
दरम्यान, XPoSAT सॅटेलाइटचे एकूण वजन ४६९ kg आहे. ज्यामध्ये १४४ किलोग्रॅमचे दो पेलोड्स आहेत. इस्रोकडून आत्तापर्यंत PSLV रॉकेटची ५९ उड्डाणे झाली आहेत. त्यामध्ये केवळ २ लाँचिंग फेल झाले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२४ रोजी ६० वे उड्डाण होत आहे.